Headlines

नागपुरात 7 महिन्यांत 851 महिलांवर अत्याचार:गुन्हेगारी वाढली; पळवून नेलेल्या 356 पैकी 331 मुलांचा लागला शोध




नागपूर शहरात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (जानेवारी ते जुलै 2026) शहरात महिला अत्याचाराच्या 851 घटनांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, बालकांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई करत पळवून नेलेल्या 356 मुलांपैकी 331 मुलांचा शोध घेतला आहे. ही आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीतून नागपूर पोलिस आयुक्तालयाकडून समोर आली आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 ते 25 जुलै 2026 या सात महिन्यांत नागपूर शहरात एकूण 13 हजार 730 गुन्हे नोंदवले गेले. यापैकी 11 हजार 811 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून 4 हजार 35 आरोपींना अटक झाली आहे. यापूर्वी 2024 मध्ये 18 हजार 412 गुन्हे दाखल झाले होते आणि 11 हजार 603 आरोपींना अटक झाली होती. 2025 मध्ये 23 हजार 867 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 21 हजार 73 गुन्हे उघडकीस आले आणि 12 हजार 585 आरोपींवर कारवाई करण्यात आली होती. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अहवालातून दिसते. 2024 मध्ये 1513 आणि 2025 मध्ये 1440 महिला अत्याचारविषयक गुन्हे दाखल झाले होते. 2026 मध्ये जुलै अखेरपर्यंत 851 गुन्हे नोंदवले गेले आहेत. यात 154 बलात्कार, 9 हुंडाबळी, 111 आत्महत्येस प्रवृत्त करणे, 215 कौटुंबिक अत्याचार, 258 विनयभंग आणि महिलांचे 9 खून यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे. 2026 च्या सात महिन्यांत 2 ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले, तर एकावर खुनी हल्ला झाला आहे. 2026 मध्ये 356 मुले-मुली पळवल्याप्रकरणी 343 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 331 मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे, तर 25 बालके अजूनही बेपत्ता आहेत. एकूण 2131 प्रौढ व्यक्ती हरवल्या होत्या, त्यापैकी 1695 जण सापडले असून 436 जणांचा शोध अजूनही सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *