Headlines

दुष्काळ निवारण, विश्वशांतीसाठी दुर्गा सप्तशतीच्या हवनाने सांगता:पर्जन्यसूक्ताच्या पठणासह राष्ट्र सुरक्षेसाठी शत्रुविनाशक मंत्रांचे उच्चारण‎




बोदवड येथील स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रात शारदीय नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून सुरू असलेल्या श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पारायणाची अष्टमीच्या पावन पर्वावर हवनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. यंदा निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती दूर होऊन भरपूर पाऊस पडावा, शेतकरी सुखी व समृद्ध व्हावेत, तसेच भारताचे शत्रूंपासून संरक्षण होऊन विश्वात शांतता प्रस्थापित व्हावी, या मंगल संकल्पनेतून पर्जन्यसूक्ताचे पठण आणि शत्रुविनाशक मंत्रांच्या माध्यमातून श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यात आले. या उपक्रमात दररोज ६१ भाविकांनी सहभाग घेतला. अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्रातील गुरुमाऊलींच्या आज्ञा व आशीर्वादाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या पारायणात भाविकांनी नियमित सहभाग घेत देवीची आराधना केली. अष्टमीला या पाठांचे विधिवत हवन पार पडले. देशात व जगात शांतता नांदण्यासाठी केली प्रार्थना देशात व जगात शांतता नांदावी, भारताचे शत्रूंपासून संरक्षण व्हावे आणि राष्ट्राची एकता-अखंडता अबाधित राहावी, या भावनेतून शत्रुविनाशक मंत्रांच्या माध्यमातून श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यात आले. या उपक्रमामागे शेतकरी, समाज आणि संपूर्ण विश्वाच्या हिताचा संकल्प दिसून आला. नकारात्मक, दुष्ट प्रवृत्तींवर सद्गुणांच्या विजयाचा संदेश दुर्गा सप्तशती हा शक्तिसाधनेतील महत्त्वाचा ग्रंथ आहे . मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्य या भागावर आधारित असलेल्या या ग्रंथात १३ अध्याय आणि ७०० मंत्रांचा समावेश आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवीच्या विविध शक्तिरूपांचे माहात्म्य यात आढळते. महिषासुर, शुंभ-निशुंभ या असुरांचा देवीने केलेला वध हा अहंकार, अन्याय, नकारात्मकता आणि दुष्ट प्रवृत्तींवर सद्गुणांचा विजय दर्शविणारा संदेश देतो. बोदवडच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात दुर्गा सप्तशती पारायण करताना महिला भाविक. आध्यात्मिकतेसोबत जोपासली सामाजिक बांधिलकी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रातर्फे धार्मिक उपासनेबरोबरच कृषिशास्त्र विभागाच्या माध्यमातून कृषी मेळावे व मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविले जातात. कमी पाण्यात अधिक चांगले उत्पादन कसे घ्यावे, उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर कसा करावा आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन यावर भर दिला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *