.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या विजयादशमीला अहिल्यानगरच्या सराफ बाजारात सोन्याच्या खरेदीला झळाळी येण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असले, तरी सोन्याच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत झालेली घसरण आणि दरातील स्थिरतेमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत आहे. यंदा पारंपरिक दागिन्यांसोबत अत्याधुनिक ‘सीएनसी’ मशिनवर तयार केलेले दागिने, दाक्षिणात्य ‘टेंपल डिझाइन्स’ आणि वजनाने हलक्या दागिन्यांना विशेष पसंती मिळत आहे.
यंदा १० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा भाव सुमारे एक लाख ४८ हजार रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी हाच दर सुमारे एक लाख ८५ हजार रुपये होता. तुलनेने दर कमी झाल्याने सराफ पेढ्यांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. सोन्याचा मुलामा दिलेल्या, दिसायला भरगच्च; मात्र वजनाने हलक्या दागिन्यांकडेही ग्राहकांचा कल आहे.
हाताने घडवलेल्या पारंपरिक दागिन्यांसोबतच सीएनसी मशिनवर तयार केलेल्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. अचूक नक्षीकाम आणि फिनिशिंगमुळे या दागिन्यांना ग्राहक पसंती देत आहेत. मंगळसूत्र, पेंडंट आणि पारंपरिक गंठणामध्ये दाक्षिणात्य टेंपल डिझाइन्सची क्रेझ वाढली आहे. धार्मिक व पौराणिक नक्षीकाम असलेल्या दागिन्यांकडे महिलांचे विशेष आकर्षण आहे. राजकोट पॅटर्नच्या डिझाइन्सही बाजारात लक्ष वेधून घेत आहेत.
काही हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होणारे सोन्याचा मुलामा दिलेले लाईटवेट दागिने सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू ग्राहकांपर्यंत पसंतीस उतरत आहेत. व्हिक्टोरियन आणि रजवाडी मंगळसूत्रांसह शॉर्ट गंठणाची मागणी वाढल्याचे सराफ व्यावसायिक आकाश मुंडलिक यांनी सांगितले.
सण-समारंभांसाठी टेंपल पॅटर्नला पसंती मिळत असल्याचे सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी सांगितले.
सीएनसी दागिने म्हणजे काय? सीएनसी म्हणजे ‘कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल’. संगणकीय नियंत्रणाद्वारे चालणाऱ्या मशिनच्या साहाय्याने दागिन्यांवर अचूक कटिंग आणि नक्षीकाम केले जाते. यामुळे डिझाइनमध्ये एकसारखेपणा आणि बारीकसारीक तपशील साधता येतात.
‘दरातील स्थिरतेने खरेदीला प्रोत्साहन’ ^“गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर नियंत्रणात असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. तरुण पिढी सीएनसी कटिंग आणि लाइटवेट दागिन्यांकडे आकर्षित झाली आहे, संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष, सराफ सुवर्णकार संघटना