![]()
काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, हे कुठल्या मूर्खाने सांगितले? 2023 मध्ये महिला आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता, असे म्हणत काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलेला सरसंघचालक करणार का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडूहोन राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या टीकेवर भाष्य केले. राहुल गांधी यांनी महिलांना संधी देण्याची भूमिका मांडली जाते, तर काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांना संधी का देण्यात आली नाही, असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी भाजप आणि संघाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला आरक्षणाचे श्रेय काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी काँग्रेसने सातत्याने भूमिका घेतली आहे. 2023 मध्ये महिला आरक्षणासंदर्भात घटना दुरुस्ती विधेयक संसदेत आणण्यात आले, त्यावेळी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस महिला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणाचे जनक आम्हीच आहोत. पेपरफुटीवरून भाजपवर निशाणा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक पेपर फुटतो आणि त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असतात. पेपर लाखो-कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याचा दावा करत या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत, कोणालातरी शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवरूनही सरकारला धारेवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नाशिककडे येताना राहुल गांधी यांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागला, राज्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अशीच खराब झाली आहे. कुंभमेळ्याच्या प्रकल्पाचा अहवाल अद्याप स्पष्टपणे समोर आलेला नसल्याचा दावा करत कामांच्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 40-40 टक्के कमिशन घेतले जात आहे, असा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला. शक्तिपीठ महामार्गाच्या कामांमध्येही कमिशनखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुंभमेळ्याच्या कामांसाठी स्थानिकांना विश्वासात घेतले जात नसल्याचे आणि ठराविक लोकांनाच कंत्राटे दिली जात असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक दरम्यान, नाशिकमध्ये काँग्रेसचे दहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, कुंभमेळ्याची कामे, शेतकऱ्यांच्या समस्या आणि राज्यातील अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. राज्यातील परिस्थिती आणि स्थानिक प्रश्नांची माहिती राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांकडून जाणून घेतली. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्र सरकार आणि संसदेत उपस्थित करण्याबाबतही राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक संपल्यानंतर राहुल गांधी शिबिरात सहभागी होऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी राज्याच्या विविध भागांतून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
हेही वाचा.. घरी जाऊन आई, बहीण, बायकोला विचारा केवढी महागाई झालीये!:सुप्रिया सुळे आक्रमक, राष्ट्रवादीचे CSMT बाहेर जोरदार आंदोलन वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करत “घरात जाऊन तुमच्या आई, बहीण आणि पत्नीला विचारा, किती महागाई झाली आहे,” अशा शब्दांत सरकारला सुनावले. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून, सरकारने महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुळे यांनी केली. सविस्तर वाचा..
Source link
RSS महिलेला सरसंघचालक करणार का?:महिला आरक्षणाचे जनक आम्हीच म्हणत पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल