Headlines

‘गोकुळ’मध्ये सतेज पाटलांचा करिष्मा; मंत्र्यांची फौज पराभूत:25 पैकी 13 जागांवर आघाडीचा विजय




कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या “गोकुळ’ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजय मिळवत सत्ता राखली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन कॅबिनेट मंत्री, खासदार आणि आमदारांची संपूर्ण ताकद विरोधात उभी असताना, अटीतटीच्या लढतीत सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि दत्त दालमियाचे गणपतराव पाटील यांच्या आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला. महायुतीच्या पदरात १२ जागा पडल्या. फेरमतमोजणी आणि अवघ्या एका मताचे बहुमत: सुरुवातीच्या कलांमध्ये समविचारी आघाडीला १४ आणि महायुतीला ११ जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ कार्यालयाबाहेर गुलाल उधळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी दोन जागांवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे गटाचे अमर पाटील विजयी घोषित झाले. त्यामुळे आघाडीची एक जागा घटून ती १३ वर आली आणि महायुतीचा आकडा १२ वर पोहोचला. गोकुळमध्ये सतेज पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले असले, तरी बहुमत आता केवळ एका जागेच्या काठावर टिकून आहे. नाविद मुश्रीफ, शौमिका महाडिकांसह दिग्गज पराभूत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि “गोकुळ’चे विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांना मतदारांनी नाकारले. एका मतपेटीतून बाहेर पडली हस्तलिखित चिठ्ठी मतमोजणीच्या वेळी एका मतपेटीतून बाहेर पडलेली हस्तलिखित चिठ्ठी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यावर लिहिले होते: “तुमच्या पोरांना सत्तेत बसविण्यासाठी आमच्या शपथा कशाला घेता?” निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना विशिष्ट देवाच्या शपथा घ्यायला लावल्याची आणि ‘शपथ मोडल्यास ब्रेनस्ट्रोक होईल’ अशी भीती दाखवल्याची जोरदार चर्चा सहकार वर्तुळात होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *