Headlines

नवरात्रीचा खरा जागर: सक्षम, स्वावलंबी अन् निर्भय नारी:अष्टभुजा हेच भारतीय नारीचं खरं रूप; महिला आता सहभागाकडून थेट नेतृत्वाकडे! – विजया रहाटकर




भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचं रूप मानलं जातं. आजची आधुनिक भारतीय नारी शिक्षण, करिअर आणि कुटुंब या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी समतोल साधत स्वतःला सिद्ध करत आहे. कौटुंबिक संस्कार, अहिल्याबाई होळकरांची प्रेरणा आणि दृढ संकल्प यांच्या जोरावर सामान्य घरातील कार्यकर्त्या ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या विजया रहाटकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय उलगडला आहे. नुकत्याच दिव्य मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक प्रवासासह समाजातील महिलांचे प्रश्न, कायदेशीर संरक्षण, राजकारणातील सहभाग आणि महिलाकेंद्री विकासावर मोकळेपणाने भाष्य केले. “आजची भारतीय महिला ही केवळ सहभाग नोंदवणारी नसून नेतृत्व करणारी आहे,” असा विश्वास व्यक्त करत, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी देशातील तमाम महिलांना आपल्यातील अष्टभुजा ताकदीचा जागर करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद… प्रश्न- सामाजिक कार्यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली? उत्तर- अहिल्याबाई होळकर या माझ्या सामाजिक कार्य करण्याची माझी प्रेरणा आहेत. केवळ माझीच नाही तर समाजकारण आणि राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेरणास्थान या अहिल्याबाई असल्या पाहिजेत. स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य, दुःख बाजूला सारून समाजसेवेसाठी आपण किती टोकाचं काम करू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. प्रश्न- आता महिला शिक्षण, करिअर आणि संसार या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत आहेत. यामध्ये अनेक अडचणी व समस्यादेखील आहेत, याकडे तुम्ही कसे पाहता? उत्तर- मुलींच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. आई-वडील, नवरा, सासू-सासरे अशा अनेक जबाबदाऱ्या महिला एकाचवेळी पार पाडत असतात. त्यानंतर मातृत्व प्राप्त होतं. दुसरीकडे करिअरही सुरू असतं. या सर्व भूमिकांमधून ती पुढे जात राहते आणि स्वतःलाही सावरत राहते. आज आपण पाहतो की ज्या महिला लग्नाआधी उत्तमपणे शिकतात, धडपड करतात आणि पुढेही जातात. सोबतच संसारासोबतही त्या उत्तम मेळ साधतात. आणि आपल्या मातृत्वालाही त्या तितकाच न्याय देतात. आता नवरात्र सुरू आहे. देवीच्या हातात आठ शस्त्र आहेत. आपण तिला अष्ठभूजा म्हणतो. ही अष्ठभूजा म्हणजेच ती खऱ्या अर्थाने भारतीय नारीचं रुप आहे. देवीची पूजा हीच नारीची पूजा आहे. हे आपण केवळ म्हणतंच नाही तर त्याचे अनुकरणदेखील करतो. आपल्या देशातील महिला ही मल्टीटास्किंग आहे. प्रश्न- लग्नानंतर संसारासोबत ताळमेळ साधताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तुमच्या आयुष्यात तुम्ही या सर्व गोष्टींना कसे सामोरे गेलात? आणि तुमचे प्रेरणास्थान कोण? उत्तर- मला असं वाटतं की हे फार काही अवघड असं नाहीये. माझे आई-वडील हे माझे आदर्श आहेत. माझे वडील हे वैदिक ब्राह्मण आहेत. त्यांचे फार दुरून दुरून मुले शिकण्यासाठी यायची. आमची आई त्या मुलांना पोटाशी घेऊन झोपली. त्या मुलांची खऱ्या अर्थाने आई झाली. समाजकार्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने घरापासूनच झाली. आमच्या घरी दुपारच्या वेळी नेहमीच पंधरा ते वीस गरजूंना लोकांना वेळेवर जेवणासाठी असायची. माझ्या आईवडिलांनी आपले संस्कार उत्तम प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हाच त्यांचा समाजकारणाचा गुण मी लहानपणापासूनच बघत आले. सामान्य माणसेसुद्धा समाजाच्या उपयोगासाठी किती पुढे येऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण हे माझ्याच घरात होतं. त्यामुळे माझे प्रेरणास्थान हे माझे पालक आहेत. तुमचे स्वप्न जेव्हा ठाम असतात आणि तुम्ही जेव्हा ठरवतात की मला माझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत, त्यावेळी घरातील व्यक्तींची जर साथ लाभली तर ते अतिशय उत्तम असते. त्याबाबतीत मी नशीबवान आहे की मला याबाबतीत माझ्या पतीने, पालकांनी, मुलीकडून साथ मिळाली. प्रश्न- संसार आणि घर सांभाळून आपण समाजकारण-राजकारणाकडे जावं असं आपणाला कधी वाटलं? उत्तर- १९९३-९४ मध्ये पंचायतीराजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाचं बिल आलं. त्यावेळी मी एमपीएससी करत होते आणि त्यात पासही झाले होते. त्याचवेळी आरक्षण आलं आणि मला तेव्हा असं वाटलं की मी आता स्वतःला सिद्ध तर केलं आहे. त्यामुळे आता अधिकारी बनून पॉलिसी इम्प्लिमेंटमध्ये जाण्याऐवजी पॉलिसी मेकिंगमध्ये का जाऊ नये, असं मला वाटलं. त्यानंतर मग मी महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि राजकारणात पाऊल टाकलं. आमच्या घरातील मुळात कुणीच राजकारणात नव्हतं. राजकारणातलं काहीचं माहिती नव्हतं. पण आमच्या घराला संघ संस्कारांचा वसा होता. त्या वातावरणामुळे मला वाटलं की आपण त्या भावनेने राजकारणात यावं. त्या काळात इतकी उत्तम शिकलेली मुलगी राजकारणात येऊ पाहते, तर तिला संधी द्यायला हवी असे नेत्यांना वाटले आणि त्यांनी मला संधीही दिली. प्रश्न- एमपीएससी करण्यापासून ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा या प्रवासात अनेक संकट आली असतील, या संकटांना कसे आव्हान दिले? उत्तर- मी अत्यंत सामान्य घरातील व्यक्ती होते. ज्यावेळी मी राजकारणात आले, त्यावेळी एक बूथ, टेन यूथ मध्ये मी काम केले. त्यानंतर राजकारणातील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर भाजप शहर पदाधिकारी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा, युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास पुढे गेला. त्यानंतर मनपाच्या विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि महापौर होण्याची संधी मिळाली. सोबतच राष्ट्रीय स्तरावर मोठी संधी मिळाली. महिला मोर्चाची राष्ट्रीय महामंत्री होण्याची संधी मिळाली. ज्यावेळी मोदीजी पंतप्रधान झाले, तेव्हा मला अमित शहांच्या टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली. महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे दादरा, दीव-दमण, राजस्थानमध्ये काम केलं. महाराष्ट्रातही 2016-21 मध्ये महाराष्ट्र आयोगाची महिला अध्यक्षा होते. यात संपूर्ण देशभरात फिरण्याची संधीही मिळाली. जमिनी स्तरावर फिरून महिलांचे प्रश्न जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. महिलांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या सुरक्षिततेकरिता जे कायदे बनवले आहेत. त्याबाबतीत जागरुकता निर्माण करणे या सर्व बाबींवर काम केले. ज्या संधी मला मिळाल्या या सर्व संधींकडे मी समाजसेवा म्हणूनच पाहिले आणि काम करत राहिले. आज मला बरं वाटतंय की, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करतांना हा अनुभव घेऊन मी पुढे जात आहे. प्रश्न- आज आपण खूप प्रगती केली आहे. डिजिटल युग सुरू आहे. तरीदेखील आजही महिलांवर अनेक बंधने आहेत. सोशल मीडियावर महिलांवरील ट्रोलिंग असेल, या समस्यांकडे तुम्ही कसे पाहता. दुसरीकडे, हिंगोलीत बापानेच मुलीवर अत्याचार केला, त्याबाबत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यावर काय सांगाल… उत्तर- फार दुर्दैवी घटना आहेत, केवळ दुर्दैवीच नाही तर फार किळसवाण्या अशा घटना आहेत. मुलींकरिता आपल्या घटनेत अनेक कायदे आहेत. महिलांच्या बाबतीत आपली न्यायव्यवस्था ही अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जर अशा घटना घडल्या तर त्यांना शिक्षा ही नक्की होते. याबाबतीत समाज म्हणतो की न्यायव्यवस्थेने न्याय दिला पाहिजे. पण या समस्या घडतात कुठे तर याच समाजात. अशावेळेस अशा नराधमांविरुद्ध समाजाने स्वतः पुढे येऊन यावर भूमिका घ्यायला हवी. अशा घटनांवर न्याय मिळतांनाही दिसतोय. नसरापूर प्रकरणही अतिशय कठीण असं प्रकरण होतं. त्यातही पोलिसांनी पंधरा दिवसांच्या आत याचा तपास केला. यात न्यायलयानं एकही सुट्टी न घेता काम केलं आणि छप्पन दिवसांत याचा निकाल दिला. अशा घटना घडतात तेव्हा न्यायव्यवस्थेवरील विश्वासही बळकट होतो. अशावेळेस याचा सर्वाधिक धक्का हा त्या संबंधित कुटुंबाला बसतो. पण या घटनेत कुटुंबीय स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. पुण्यातील गणेशोत्सवात त्या कुटुंबाने एक पथनाट्य बसवलं आणि मुलींचे रक्षण कसे करावे याबाबत जागरुकता निर्माण केली. पीडित मुलीच्या वडिलांनी समोर येऊन अशा घटना घडल्यानंतर त्यांना कसे सामोरे जावे याबाबत आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केले. स्वतःचं दुःख बाजूला सारून त्यांनी समाजाला यापासून जागरुक करण्याचं काम केलं. समाजात अशा अनेक घटना घडतात. त्याकरिता त्यांनी काम करायला सुरुवात केली. इतरांना आधार देण्याचं काम ते आता करत आहेत. प्रश्न- देशभरात आंदोलने होत आहेत, त्यात महिलांचाही सक्रिय सहभाग आहे. महिलांनी राजकारणात यावं. त्यांनी धोरणकर्ते, राज्यकर्ते व्हावे असे आपले सरकार म्हणते. पण ज्यावेळी त्याच मुली रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना आपण गटारछाप म्हणतो. या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय असेल? उत्तर- मुळात या सगळ्या घटना अत्यंत संवेदनशील आहेत. राजकारणावर बोलणं हा माझा काही विषय राहिलेला नाही. पण मी यावर एकच सांगेल की, या अशा घटना घडल्या आहेत यांना दोन बाजू आहेत. यावर न्यायालयात निर्णय सुरू आहेत. यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची आणि भूमिकेची आपण वाट बघितली पाहिजे. प्रश्न- आयोगाचे काम करताना निर्णय घेताना संवेदनशील प्रकरणांमध्ये संयम आणि कठोरता यांचा ताळमेळ कसा साधता? उत्तर- माणसं ही भावनांवर चालतात. आपल्याला ज्यावेळी जी गोष्ट करायची आहे, ती करावीच लागते. आमच्याकडे रोजची अनेक प्रकरणे समोर येतात. त्याचा ताणही नक्कीच येतो. अशावेळेस तुम्ही कणखर राहून महिलांना मुलींना न्याय मिळण्यासाठी व्यवस्थांकडून काम करून घ्यावं लागतं. त्याकरिता कधीकधी कठोर भूमिकाही घ्याव्या लागतात. प्रशासकीय व्यवस्थांच्या सर्व कामांवर आमचे लक्ष असते. आम्ही सुमोटो कॉग्नियन्स घेतो, जे सिरीयस असतात. त्या विषयांवर ताबडतोब काम करावं लागतं त्यासाठी आम्ही थेट डीजींना पत्र लिहितो आणि त्याकरिता या कारवायांचा फॉलोअपही घ्यावा लागतो. त्याबाबतीत नीट लक्ष घालून कधीकधी कठोर निर्णयही घ्यावे लागतात. अशाबाबतीत आम्ही समन काढतो, कठोर कारवाई घेत असतो. दुसरीकडे, नातेवाईक आणि महिलांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राहावं लागतं. सोबतच अनेक महिलांचे त्रास आम्ही बघतो. पण सर्व जग हे वाईट नाही. काहीतरी अपवादा‍त्मक परिस्थितीत अशा घटना घडत असतात. वाईट गोष्टी दिसतात, त्यावर कामही केलं पाहिजे. पण याच जगात अनेक चांगली लोकही आहे. तो चांगुलपणाही आपण पाहिला पाहिजे. त्याकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. यामुळे व्यक्तीला सकारात्मक राहण्यास मदत मिळते. प्रश्न- छत्रपती संभाजीनगरच्या महिला महापौर म्हणून तुम्ही घेतलेला उत्तम निर्णय कोणता किंवा कोणता असा निर्णय आहे, जो तुम्हाला वाटतो की हा निर्णय घेणे योग्य होते? उत्तर- माझ्या काळातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे हे शहर नेहमीच पाण्याकरिता तहानलेलं होतं. त्या काळात मी शहरात पाण्याच्या टाक्यांचं काम केलं. शहरात पाणी तर येईल, पण ते साठवायचं कुठे हा मोठा प्रश्न होता. माझ्याच काळात जे 148 कोटी रुपये आलेत ते माझ्याच काळात आलेले आहेत. ही पाणीपुरवठा योजना दरवेळेस सुधारित झाली आहे. पण ही योजना माझ्याच काळातील आहे. आज ती योजना पुढे जात असल्याचा आनंद आहे. आज शहरात जे काही कामं सुरू आहेत, ती सर्वकाही माझ्याच काळात घेतल्या गेलेले निर्णय आहेत. प्रश्न- महिलांना मॅटर्निटी लिव्ह देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, याचा एक परिणाम असा आहे की कंपन्या त्या कारणामुळे महिला कर्मचाऱ्यांना घेण्यास विचार करतात, एकादृष्टीने याचा त्यांच्या रोजगारावर वाईट परिणाम होतो? उत्तर- एक लक्षात ठेवा की, आपण जेव्हा चालतो तेव्हा दोन पायांवरच चालतो. कोणताही रथ हा दोन चाकांवरचं चालत असतो. कोणत्याच रथाने असं नाही म्हटलं की मला झुकते माप द्या. कारण त्याला माहिती आहे की जर मला झुकते माप दिले, तर त्यामुळे समतोल बिघडणार आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्यावरच होणार आहे. याच निमित्ताने तुम्हाला सांगते की, महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळते तसेच वडिलांनाही पॅटर्निटी लिव्ह देण्यात यावी याची शिफारस आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. मला वाटते की, कंपन्या याबाबतीत असा विचार करणार नाहीत. याचे कारण म्हणजे महिला या उत्तमप्रकारे जबाबदारी पार पाडतात. पण या महिलांचा जर तुम्ही सन्मान केला तर तुम्हाला त्यांच्याइतके काम करणारे व्यक्ती दुसरे कुणी मिळणार नाही. मॅटर्निटी लिव्ह हा केवळ तिच्या मातृत्वाचा सन्मान नाही तर तिच्या बाळाचा, कुटुंबाचादेखील सन्मान आहे. केवळ कायदा केला म्हणजे त्याचा फायदा घ्यावा, एवढेच नाही, तर त्याचा साकल्याने विचार करायला हवा. प्रश्न- आजच्या आधुनिक काळात ‘सक्षम आणि स्वावलंबी स्त्री’ या संकल्पनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता? तसेच, नवरात्रीच्या या पवित्र उत्सवात, संघर्षाचा सामना करणाऱ्या आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या देशातील तमाम माता-भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल? उत्तर- मी आजच्या परिस्थितीत एकच गोष्ट सांगेन. भारताच्या महिला या आज अत्यंत स्वावलंबी होत आहेत. भारतातील महिला या केवळ सहभागीकर्त्या नव्हत्या, तर त्या नेहमीच नेतृत्वकर्त्या होत्या. ही गोष्ट आजपासूनच नाही, तर आपल्या पुराण काळापासून चालत आल्या आहेत. म्हणून आपण गार्गी मैत्रेयीपासून सुरू करतो तर आजपर्यंत आपण येऊन थांबतो. जगात सर्वात जास्त महिला पायलट या भारतात आहेत. महिलांनी प्रत्येक बाबतीत स्वतःला सिद्ध केलं आहे. आता आपण केवळ महिलांच्या विकासाबाबत बोलत नाही, तर महिलाकेंद्रित विकासाच्या दिशेने काम करत आहोत. आज मी तुम्हाला भारतातील महिला सक्षम कशा आणि स्वावलंबी कशा याबाबतीत दोन-तीन गोष्टी नक्की सांगेन. महिलांच्या संरक्षणासाठी आपल्याकडे अतिशय उत्तम कायदे आहेत. डोमेस्टिक व्हायलेन्स, सोशियल हरॅशमेन्ट, पोक्सो कायदा आहे. एवढंच नाही तर आता नोकरदार महिलांसाठी मॅटर्निटी लिव्हही मिळायला लागल्या आहेत. याबाबतीत जगातल्या बोटावर मोजता येणाऱ्या देशांमध्ये भारताचाही सहभाग आहे. यात आपण केवळ मातेचा सन्मान नाही, तर तिच्या कुटुंबाचा आणि बाळाचा सन्मान केलाय.
आताच्या लेबर कोडमध्ये महिलांना अधिकृतरित्या नाईट शिफ्ट करता येत आहे. त्यांच्या संरक्षणाही जबाबदारी संबंधित संस्ंथावर दिली आहे. सोबतच त्यांच्या समान वेतनाचाही विचार केला गेला आहे. रोजगार हमी योजनाबाबत महिलांबाबत उत्तम योजना आहेत. गावातील स्त्रियांकडे कोणाचे लक्ष जात नाही असे आपण म्हणतो पण आपण त्यांना १२५ दिवस रोजगाराची हमी दिली आहे. त्यासोबतच त्या महिलांना अनेक संधीही दिल्या आहेत. महिलांना पुढे पर्यवेक्षक बनता येईल, पुरुषांच्या बरोबरीने कामं मिळतील, मुलांना सांभाळण्याकरिता व्यवस्था असेल. सोबतच शक्तीवंदन बिलही पारित झालेलं आहे. आता मी फक्त कायद्याबद्दल बोलले, पण मी नीतींबद्दलही बोलेल. आज आपल्या देशातील महिला आपल्या पायावर उभी राहावी, यासाठी आपण अनेक नीती केल्या आहेत. आज आपण उत्तमरित्या महिलांच्या स्वास्थ्याचं रक्षण करायला लागलो आहोत. हे आधी कुठे होतं, याची सुरुवात आपण उज्ज्वला योजनेपासून केली आहे. महिलेचे आरोग्य हे आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. हे आपण केवळ म्हटलं नाही तर करूनही दाखवलं आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, मिशन इंद्रधनुष, आयुष्मान भारत या योजनांद्वारे आपण महिलांची योग्य काळजी घेत आहे. अतिशय उत्तमपणे आपण महिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेत आहे. महिला हेल्थ चेकअप कॅम्प हे अनेक दिवसांपासून सुरू आहेत. महिलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी मुद्रा योजना, स्टार्टअप-स्टँडअप सारख्या योजनांच्या रुपाने मदत केली आहे. त्या आपल्या पायावर उभ्या राहून प्रगती करत आहेत. आपल्या देशात 10 कोटींहून जास्त महिला सेल्फ हेल्प ग्रूपमध्ये काम करत आहेत. ज्या महिलांना सही करता येत नव्हती, त्या आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहेत. एज्युकेशन पॉलिसीमध्येही मुलींना पुढे जाण्याकरिता शिक्षणाकरिता व्यवस्था केली आहे, मातृभाषेत शिकण्याची व्यवस्था केली गेली आहे. आज जगाच्या पटलावर STEMM (स्टेम)मध्ये शिकणाऱ्या सर्वाधिक मुली जर कुठे असतील तर त्या भारतात आहेत. STEMM म्हणजे S- SCIENCE, T- TECHNOLOGY, E- ENGINEERING, M- MATHEMATICS, M- MEDICINE… या सगळ्यांमध्ये जगात सर्वाधिक महिला या भारतात शिकत आहेत. 44% पेक्षा जास्त मुली या भारतात शिकत आहेत. जेव्हा आजची शिक्षण घेणारी मुलगी ही कार्यप्रणालीमध्ये येईल तेव्हा याच मुली भारताच्या जीडीपीमध्ये भर घालणार आहेत. एवढंच नव्हे तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नेतृत्व करणाऱ्याही मुलीच आहेत. अशा पद्धतीने मुली पुढे जात आहेत. तसेच, सैन्यामध्येही भारताच्या मुली सक्रियपणे कार्य करतांना दिसत आहेत. या सगळ्या संधी घेऊनच महिला पुढे जात आहेत. आता महिलांसाठी उत्तम वातावरण आहे. फक्त आपण ते समजून घेतलं पाहिजे. केवळ शिक्षण न करता आपल्या प्रगतीसाठी आपण काय करू शकतो, याचा आपण विचार केला पाहिजे. शिकण्याकरिता पुढे जाण्याकरिता आपल्याला काय संधी आहेत, याचा विचार केला पाहिजे. कौशल्य विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वा बाब म्हणजे आपल्या सुरक्षेकरिता आणि सन्मानाकरिता जे कायदे केले आहेत, ते आपणास माहिती पाहिजे. संकटकाळात त्यांना मदत करणारी हेल्पलाईन 181, 112 या महिलांना माहितीच पाहिचे. हे आपल्याला नीट माहिती असणं गरजेचं आहे. या सर्व संधी, हेल्पलाईन नंबर जेव्हा आपण शाळा, परिवार म्हणून त्यांना सांगणार असू तर त्यांना मोकळ्या आकाशात भरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आजच्या महिलांना एकच सांगेन की नवरात्र आहे, या नवरात्रात आपण नऊ दिवसांचे नऊ रंग सोबत घेऊन साजरे करतो. करा काही हरकत नाही, पण त्यासोबतच आपण अष्टावधानी आहोत. आपल्याकडे निसर्गाने दिलेली शक्ती आहे, तिचा आपण जागर केलला पाहिजे. नवरात्रीच्या निमित्ताने यापेक्षा उत्तम शुभेच्छा असूच शकत नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *