- Marathi News
- National
- Lalit Modi Claims Dawood’s Conspiracy To Take Over IPL; Said Your Work Is Over, Threats For Refusing To Bet
नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी कमिशनर ललित मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनीकडून मिळालेल्या जिवाच्या धमक्यांमुळेच त्यांनी क्रिकेट प्रशासन कायमचे सोडले. २०१० पासून लंडनमध्ये राहत असलेल्या आयपीएलच्या माजी कमिशनरने सांगितले की, सट्टा बाजाराला प्रोत्साहन देण्यास नकार दिल्याने ते निशाण्यावर आले.
२०१२ मध्ये लंडनच्या एका पेंटहाऊसमध्ये मध्यस्थाने सॅटेलाईट फोनवर दाऊदशी त्यांचे बोलणे करून दिले, ज्याने त्यांना काम बंद करण्याची धमकी दिली. अंडरवर्ल्डला आयपीएल फ्रँचायझीवर ताबा आणि सट्टा बाजारात झालेल्या मोठ्या नुकसानीची भरपाई हवी होती.
लंडनला रात्री ३:३० वा. एका फिक्सरच्या फोनवर दाऊदशी बोलणे, मुलाच्या अपहरणाचाही प्रयत्न
जेव्हा मी आयपीएल चेअरमन होतो, तेव्हा मी स्पॉट-फिक्सिंग रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आणि करोडो डॉलर्सची लाच नाकारली. याच कारणामुळे डी-कंपनी माझ्यावर चिडली होती. सर्वात भयानक प्रसंग वर्ष २०१२ मध्ये लंडनमध्ये घडला. रात्री सुमारे ३:३० वाजता एका फिक्सरच्या दबावाखाली मी ‘बाबा’ नावाच्या मध्यस्थाच्या पेंटहाऊसमध्ये पोहोचलो. तिथे मध्यस्थाने बाल्कनीत सॅटेलाइट फोनवरून थेट दाऊद इब्राहिमला लावून फोन स्पीकरवर ठेवला. खाली ब्रिटिश सुरक्षा संस्था एमआय५ तैनात होती, पण दाऊदचा आवाज ऐकून भीतीने माझी पँट ओली झाली होती.
दाऊद थेट म्हणाला- ‘आतापासून तुझे सर्व काम संपले’ आणि त्याने फोन कट केला. यानंतर तर जणू फोन कॉल्सचा पूरच आला. तो मध्यस्थ मला दर आठवड्याला फोन करू लागला. ते लोक माझ्याकडे पैशांची मागणी करत होते आणि त्यांचे म्हणणे होते की अंडरवर्ल्डला आता एका आयपीएल फ्रँचायझीवर आपले नियंत्रण हवे आहे. यानंतर अंडरवर्ल्ड आयपीएल फ्रँचायझीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सट्टा बाजारात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी खंडणी मागू लागला.
वास्तविक, २००९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे जेव्हा मी अचानक आयपीएल दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित केले, तेव्हा बुकींचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर मुंबई, जोहान्सबर्ग आणि क्रोएशियामध्ये माझ्यावर जीवघेण्या हल्ल्यांचे कट रचले गेले, एवढेच नाही तर लंडनमध्ये माझ्या मुलाचे अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला. अखेरीस, मी त्यांना शब्द दिला की मी क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेईन. आज लोक माझ्या भारत सोडण्यामागे आर्थिक चौकशी हे कारण सांगत असले, तरी सत्य हेच आहे की माझ्या खेळापासून दूर जाण्यामागे अंडरवर्ल्डची हीच दहशत कारणीभूत होती. – ललित मोदी यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या.