![]()
हिंगोलीच्या भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांना निधीचा पुरवठा होत नसल्याने बाजार समिती अंतर्गत हळद व इतर शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून बँकेला आवश्यक सूुचना देण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी ता. १० केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, प्रशांत सोनी, पवन मुंदडा, राजेश मुंढे, विक्रम गोविंदवार, आशिष हेडा यांच्यासह व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी गुप्ता यांची भेट घेतली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील एक प्रमुख कृषी बाजारपेठ असून येथे विशेषतः हळदीचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. सध्या हळदीचा हंगाम सुरू असून बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावर्षी जिल्ह्यात “एक जिल्हा एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत हळदीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यामुळे बाजारपेठेत हळदीची आवक लक्षणीयरित्या वाढली आहे. मात्र बँकेकडून इतर बँकांना आवश्यक निधीचा पुरवठा केला जात नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेला चेस्ट बँक म्हणून प्राधिकृत केलेले असून, या बँकेमार्फतच इतर बँकांना रोख निधीचा पुरवठा केला जातो. परंतु सध्याच्या परिस्थितीत या बँकेकडून इतर बँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे व आवश्यकतेनुसार निधी पतपुरवठा केला जात नसल्यामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत. सदर परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या व व्यवहार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जाणवत असून संपूर्ण जिल्ह्यात समान अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या खात्यातील उपलब्ध रक्कमही वेळेवर मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांना देयके अदा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. तर बाजारातील खरेदी-विक्री व्यवहार मंदावले असून मोंढ्यातील व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.
Source link
भारतीय स्टेट बँकेकडून निधी पुरवठ्याचा अभाव:हळद खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव