![]()
दुबई आणि बँकॉक येथून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करून बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करून भारतात आणण्यात आले आहे. आरोपी गणेश काळेविरुद्ध पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये देहूरोड पोलीस ठाण्यात ऑनलाईन टास्क फसवणूक, हिंजवडी पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये १८ लाख रुपयांची फसवणूक, तर सायबर पोलीस ठाण्यात शेअर मार्केटच्या नावाखाली २ कोटी ६६ लाख रुपयांची मोठी फसवणूक यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी गणेश काळे थेट चीनमधील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होता. तो भारतातील नागरिकांकडून बँक खाती मिळवून सायबर गुन्ह्यातून आलेला पैसा गोळा करण्यासाठी त्यांचा वापर करत असे. चिनी साथीदारांच्या मदतीने तो भारतीय नागरिकांना ‘टास्क फ्रॉड’, ‘शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ आणि ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या क्लृप्त्या वापरून कोट्यवधी रुपयांना लुटत होता. हा सर्व काळा पैसा तो दुबईत बसून हाताळत होता. जून २०२४ मध्ये देहूरोड पोलिसांनी या प्रकरणात १३ आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत गणेश काळे हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत दुबई एम्बेसी येथे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, पोलिसांची कारवाई चुकवण्यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी दुबई सोडून बँकॉक (थायलंड) येथे पळून गेला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा करून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि एलओसी जारी करून घेतली. थायलंडमधून दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना, रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे बँकॉक विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर ११ जून २०२६ रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोलीस अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, तसेच पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने केली आहे.
Source link
आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार गणेश काळेला बँकॉक विमानतळावर अटक:पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 'रेड कॉर्नर नोटीस'द्वारे केली कारवाई