![]()
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या
.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार व वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव अग्रभागी आहे. तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही नावे निमंत्रक व पाहुणे म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना या पत्रिकेतून पूर्णपणे डावलण्यात आले आहे.
“आम्ही मान राखतो, मग इथेच असे का?” – नरेश म्हस्के
कार्यक्रम पत्रिकेतून पालकमंत्र्यांचे नाव वगळल्याचे समोर येताच खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाविरोधात आणि स्थानिक नेतृत्त्वाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले:
“ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार सुरू आहे तो अत्यंत चुकीचा आहे. ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. यापूर्वी जेव्हा शिवसेनेची युतीशिवाय एकहाती सत्ता होती, तेव्हाही आम्ही भाजपच्या नेत्यांचा योग्य तो सन्मान राखून पत्रिकेत त्यांची नावे टाकत आलो आहोत. मात्र, नवी मुंबईत जर वारंवार आमच्या नेत्याचा असा अवमान केला जात असेल, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. या अवमानाचे उत्तर ‘शिवसेना स्टाईल’ने दिले जाईल.”
डावलण्याची ही दुसरी वेळ; कॅबिनेटमध्ये उमटले होते पडसाद
एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत नवी मुंबईत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला, मात्र या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले नव्हते. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि त्याचे तीव्र पडसाद थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले होते. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले होते.
“मला कल्पना नाही, आयुक्तांना विचारा” – गणेश नाईक
आज राज्यात शाळांचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वनमंत्री गणेश नाईक नवी मुंबईतील एका शाळेत आले होते. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना या नव्या वादावर आणि कार्यक्रम पत्रिकेतील नाव वगळल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना नाईक यांनी हात झटकले. “मला या कार्यक्रम पत्रिकेबाबत कोणतीही कल्पना नाही. हा पालिकेचा अंतर्गत विषय असून याबाबत तुम्ही थेट महापालिका आयुक्तांनाच विचारा,” असे सांगत त्यांनी या वादावर अधिक बोलणे टाळले.