![]()
पुण्यात वनराई संस्थेच्या वतीने ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. नैसर्गिक शेती, विषमुक्त अन्ननिर्मिती आणि जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या पुस्तकाचे लेखक प्रमोद जाधव आहेत. प्रमोद जाधव हे नैसर्गिक शेतीचे अभ्यासक, प्रयोगशील शेतकरी आणि समाजकल्याण विभागाचे सह आयुक्त आहेत. या प्रकाशन सोहळ्याला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, कृषी प्रक्रिया व नियोजन-विस्तार विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी-जैवविविधता तज्ज्ञ संजय पाटील, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, सचिव अमित वाडेकर आणि लेखक प्रमोद जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना समाजकल्याण विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी डिजिटल युगात माहितीचा साठा मोठा असला तरी पुस्तके आणि ग्रंथालये ही ज्ञान जतन करण्याची प्रभावी माध्यमे असल्याचे सांगितले. आपण जे अन्न खातो, त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याने नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंद आणि आव्हानांचा उल्लेख करत, चांगले पीक आले किंवा वेळेवर पाऊस पडला की शेतकऱ्याला सर्वाधिक आनंद होतो, असे त्या म्हणाल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी संवर्धन आणि जल पुनर्भरणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पाण्याची बचत करणे ही केवळ सरकार, प्रशासन किंवा स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः मराठवाड्यासारख्या भागात कमी पाऊस आणि पाण्याची टंचाई असल्याने जलसंवर्धनाला प्राधान्य देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांमध्ये अन्न ही जगण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गरज असल्याचे सांगितले. सुरक्षित, पोषक आणि विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांनी बदलती जीवनशैली, शेतीमधील रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर आणि डबल पॉलिश तांदळाच्या सेवनामुळे कमी वयात विविध आजार जडत असल्याची चिंता व्यक्त केली. मात्र, या समस्यांवर केवळ टीका करण्याऐवजी प्रमोद जाधव यांनी या पुस्तकातून सक्षम पर्याय मांडल्याचे त्यांनी सांगितले. लाल तांदळाच्या देशी जातींचा शोध, त्यांचे संवर्धन आणि अधिक उत्पादनासाठी केलेले प्रयोग हे दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Source link
नैसर्गिक शेती, पाणी संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे:दीपा मुधोळ-मुंडे यांनी 'आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केले आवाहन