Headlines

बीजेएसचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी आधार:पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अमरावतीत भावपूर्ण निरोप




भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली पुनर्वसन प्रकल्पात नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्यात आला आहे. १५ जून २०२६ पासून सुरू झालेल्या नवीन सत्रासाठी पुण्याला रवाना होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना अमरावती येथे एका भावपूर्ण निरोप समारंभात निरोप देण्यात आला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने बीजेएसने हे पाऊल उचलले आहे. गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. बसस्थानकासमोरील जैन छात्रालय येथे हा निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीचंद तेजवानी होते. भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त सुदर्शन जैन, जेसीजचे माजी पदाधिकारी अमृत मुथा, पत्रकार अनिल मुनोत, ज्येष्ठ विधीज्ञ विजय बोथरा, सीए राजेश चांडक, भारतप्रकाश खजांची, अनिल बोथरा, वैशाली हांडा, अभिनंदन पेंढारी आणि कोमलजी बोथरा यांसह अनेक मान्यवर, पालक व नागरिक यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बीजेएसच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम ग्रामीण भागातील आणि संकटग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून, त्यांना दर्जेदार शिक्षणासह सर्वांगीण विकासाची संधी मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या. संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी बीजेएसने घेतलेला हा पुढाकार समाजात एक आदर्श निर्माण करत असल्याचेही अनेकांनी नमूद केले. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शुभम जैन आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा निरोप समारंभ यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे संचालन नितेश जैन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष शुभम जैन यांनी मानले. या संवेदनशील उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची योग्य निवड करणे, त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांची संमती मिळवणे यासाठी संघटनेच्या समन्वयकांनी विशेष मेहनत घेतली. समन्वयक प्रताप ब्राह्मणवाडे, नितीन जाधव आणि त्यांच्या पत्नीने यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके नियोजन व आयोजन प्रदीप जैन यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *