Headlines

नागपूर विमानतळ विकास वेळेपूर्वीच पूर्ण होणार:जीएमआर समूह आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करणार




जीएमआर समूहाने नागपूर विमानतळाचा विकास निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करण्याची हमी दिली आहे. २५ जून २०२६ रोजी विमानतळाचे कामकाज अधिकृतपणे हाती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जीएमआर समूहाचे कार्यकारी संचालक एस.जी.के. किशोर यांनी ही माहिती दिली. यापुढे नागपूर विमानतळ विकासात कोणताही विलंब होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर उपस्थित होते. किशोर यांनी सांगितले की, जीएमआर समूहाने यापूर्वी नवी दिल्ली, हैदराबाद, गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) तसेच फिलिपिन्स आणि इंडोनेशियामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांचा विकास वेळेपूर्वीच पूर्ण केला आहे. याच अनुभवाच्या आधारे नागपूर विमानतळाचा विकासही वेळेत पूर्ण केला जाईल. पूर्वी हैदराबाद विमानतळ देशाचे मध्यवर्ती विमानतळ म्हणून विकसित करण्यात आले होते, परंतु आता नागपूर विमानतळाचा विकास देशाचे मुख्य ‘मध्यवर्ती विमानतळ’ म्हणून केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ३० वर्षांच्या करारांतर्गत जीएमआर समूह येथे नवीन टर्मिनल, धावपट्टी आणि आधुनिक कार्गो सुविधा विकसित करणार आहे. पुढील काही दशकांत नागपूरची प्रवासी क्षमता ३ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरेल. यासाठी जीएमआर समूह एकूण ३,२७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात वार्षिक ४० लाख प्रवासी क्षमतेची अत्याधुनिक ‘डायमंड’ आकाराची टर्मिनल इमारत आणि २०,००० मेट्रिक टन क्षमतेची कार्गो सुविधा उभारली जाईल. दुसऱ्या धावपट्टीचे काम आणि नवीन टर्मिनल पूर्ण होताच दुबई, सिंगापूर आणि बँकॉकसारख्या प्रमुख जागतिक शहरांसाठी थेट नागपूरमधून विमान सेवा सुरू होईल. यासाठी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी वाटाघाटी सुरू झाल्या असून, नागपूर विमानतळाचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने विकास केला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *