Headlines

हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम:एक महिन्यात 21.12 लाखांचा मुद्देमाल जप्त, डीवायएसपी मयूर रसाळ यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव




हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यांमध्ये मागील एक महिन्यात एकूण 21. 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ यांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश बसविण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भरवसा सेलच्या पथकाला सोबत घेत पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी मागील एक महिन्यात धडक कारवाई सुरू केली. दरम्यान जिल्ह्यात अवैध वाळू उपसा, मटका, अवैध दारू विक्री आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिस अधिक्षक रसाळ यांनी त्यांच्या पथकाच्या माध्यमातून अवैध व्यवसाची माहिती घेऊन छापासत्र सुरू केले होते. या शिवाय अवैध वाळू उपसा तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम देखील सुरू केली.

यामध्ये मधील एक महिन्यात कळमनुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये 5,75,000 रुपये आणि 9,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत वाळू माफिया आणि मटका जुगारावर धाड टाकून अनुक्रमे 7,20,000 रुपये आणि 54,690 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बासंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत 7,38,000 रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात अनुक्रमे 10,270 रुपये आणि 2,400 रुपयांचा ऐवज जप्त केला, तर हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व कारवायांमध्ये मयूर रसाळ यांनी दाखवलेल्या कर्तव्यतत्परतेचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे. अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे पोलिस खात्याचा नावलौकिक उंचावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन कौतुकाची थाप दिली जात असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *