Headlines

हा घोटाळा नाही, प्रभू रामाच्या नावावर टाकलेला सरळ दरोडा:राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात नागपूर शहर काँग्रेसचे 'रामनाम' आंदोलन




नागपूर शहर काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात अनोखे आंदोलन केले. नेहमीच्या राजकीय घोषणांऐवजी, कार्यकर्त्यांनी पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर टाळ-मृदंगाच्या गजरात रामनामाचा जयघोष करत निषेध नोंदवला. या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या कथित चोरी आणि दरोड्याचा निषेध करण्यासाठी हा मार्ग निवडला. यावेळी आंदोलकांनी रामाचा जयजयकार करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. नागपूर शहर काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. “अयोध्येमध्ये जे घडले, त्याला केवळ चोरी म्हणता येणार नाही, तर तो सरळ सरळ दरोडा आहे,” असे तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. गुडधे पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ट्रस्टच्या देखरेखीखाली हा सर्व प्रकार घडला आहे. देशभरातील लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दान करतात, मात्र त्यांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा बाजार मांडला गेला आहे. मागील अनेक वर्षांपासून अयोध्येत मोठ्या प्रमाणावर ही लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेहमी रामाच्या नावावर मते मागतात, निवडणुका लढवतात; मात्र या संपूर्ण गैरव्यवहारावर त्यांनी आता मौन धारण केले आहे, असा टोला गुडधे पाटील यांनी लगावला. भावनांचा बाजार मांडणाऱ्यांच्या विरोधातच हे आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकावर (SIT) त्यांनी अविश्वास दाखवला. ही एसआयटी म्हणजे केवळ “तोंडाला पाने पुसण्याचा” प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली. या प्रकरणाची एखाद्या न्यायाधीशांच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुडधे पाटील यांनी केली आहे. दोषींना कडक शासन झालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *