Headlines

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस:खंडणी प्रकरणी खंडाळा पथकातील 5 अंमलदार निलंबित, सखोल चौकशी सुरू




पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून खंडणी मागणाऱ्या महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील दोषी अंमलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांची खात्यांतर्गत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. विमाननगर, पुणे येथील रहिवासी उमेश शर्मा (वय २८) हे आपल्या सहकाऱ्यांसह चारचाकी वाहनाने लोणावळ्याकडे पर्यटनासाठी जात होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मौजे ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत अंबर दिवा लावलेल्या एका वाहनातील सहा जणांनी त्यांची गाडी थांबवली. आरोपींनी पर्यटकांकडे अंमली पदार्थ असल्याचा खोटा संशय व्यक्त करत कारवाई करण्याची भीती दाखवली आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढेच नाही, तर त्यांना जबरदस्तीने तळेगाव दाभाडे परिसरात नेऊन एटीएममधून पैसे काढून देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारानंतर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, या गुन्ह्यात हायवे ट्रॅफिक ड्युटीवर असणाऱ्या खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि वॉर्डन यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी पोलीस अंमलदार अमोल महादेव ननावरे (वय ३६), तुषार बाळू ढावरे (वय ३३), होमगार्ड तुषार संजय घाडगे (वय ४१), किसन कोंडीबा बांबले (वय ३२) आणि ट्रॅफिक वॉर्डन नितेश दिपक चव्हाण (वय ३२) या पाच आरोपींना अटक केली आहे. तपासात खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार अमोल अशोक वायकर याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. कर्तव्यावर असताना पर्यटकांना लुटणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या गुन्हेगारी कृत्याची पुणे ग्रामीण पोलीस दलाने गंभीर दखल घेतली आहे. महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी पाठवलेल्या अहवालावरून दोषी पोलीस अंमलदारांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची खात्यांतर्गत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत. हे ही वाचा… पार्थ पवार मुंढवा जमीन प्रकरण:जमीन दस्त रद्द, 40 एकर सरकारी जमिनीच्या खरेदीचा व्यवहार न्यायालयाने नाकारला पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्यातील खरेदीचा दस्त न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचा मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदीचा हा दस्त रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *