Headlines

लोहाऱ्यात नवे ‘नमो’ उद्यान सजले; जुन्या बालोद्यानांची मात्र दुरवस्था:लोहाऱ्यात कोटीच्या निधीतून उद्यान अंतिम टप्प्यात; काही दिवसांत लोकार्पण‎


.

लोहारा शहरालगत पाटोदा रोडशेजारी नगरपंचायतीकडून नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जवळपास एक कोटी रुपये खर्चून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत त्याचे लोकार्पण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी व्यायाम व चालण्याची सुविधा, योगा शेड, आकर्षक पथदिवे, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याचे शुद्ध पाणी, बैठक व्यवस्था, शौचालय आणि हिरवळ अशा विविध सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लोहारा शहराला १० जुलै २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. मात्र, त्यानंतरही शहरात नागरिकांसाठी सुसज्ज उद्यानाची प्रतीक्षा कायम होती. विशेषतः लहान मुलांसाठी खेळण्याची आणि विरंगुळ्याची हक्काची जागा नसल्याने त्यांचा वेळ घरातील टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटवर अधिक जात असल्याचे चित्र होते. मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक विकास होतो. त्यामुळे शहरात उद्यानाची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

दरम्यान, सुमारे तीन वर्षांपूर्वी नगरपंचायतीकडून शहरातील प्रभाग क्रमांक ८ आणि ११ मध्ये दोन बालोद्यानांची उभारणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरी दलितेत्तर योजनेतून १८.५० लाख रुपये, तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. या दोन उद्यानांमुळे शहरातील चिमुकल्यांना विरंगुळ्याची जागा उपलब्ध झाली. आता त्यात ‘नमो उद्याना’ची भर पडली आहे. उद्यानातील संरक्षक भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करून चिमुकल्यांना आकर्षित करणारी चित्रे साकारण्यात आली आहेत. पाण्याच्या सुविधेसाठी बोअरवेलचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानात वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, नव्या उद्यानासोबत जुन्या बालोद्यानांच्या देखभालीचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रभाग क्रमांक ८ व ११ मधील उद्यानांची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले, बेंच तुटलेल्या आणि अस्वच्छता असल्याचे दिसून आले. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या उद्यानांची नियमित देखभाल होणे गरजेचे आहे. नव्या उद्यानाचीही अशीच अवस्था होऊ नये, यासाठी नगरपंचायतीने देखभालीची ठोस व्यवस्था करणे आवश्यक आहे.

जुन्या उद्यानांकडेही लक्ष द्या : प्रभाग क्रमांक ८ आणि ११ मध्ये लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बालोद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहणीत दिसून आले. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून काही बेंच तुटलेल्या अवस्थेत आहेत. परिसरात अस्वच्छताही दिसून येत आहे. नव्या नमो उद्यानाची उभारणी कौतुकास्पद असली तरी जुन्या उद्यानांची नियमित स्वच्छता, दुरुस्ती आणि देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या या सुविधा वापरण्यायोग्य आणि सुरक्षित राहण्यासाठी नगरपंचायतीने स्वतंत्र देखभाल यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

काही दिवसांत नागरिकांसाठी खुले लोहारा शहरातील वृद्ध नागरिक, लहान मुले आणि महिलांसाठी नमो उद्यानात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसांत लोकार्पण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. शहरवासीयांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि उद्यानाची स्वच्छता व सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे. – वैशाली खराडे, नगराध्यक्षा, लोहारा नगरपंचायत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *