Headlines

पुरातन शिवमंदिर परिसरात कचरा अन् दुर्गंधी:भाविकांत तीव्र संताप, वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पर्यावरण धोक्यात‎




मेळघाटच्या निसर्गरम्य आणि वन्यजीवांनी समृद्ध अशा हरिसाल परिसरातील पुरातन शिवमंदिर परिसरात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यामुळे पर्यावरणासह वन्यजीवांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडी बाजारानंतर निर्माण होणारा कचरा, तसेच कोंबड्या व बकऱ्यांचे अवशेष थेट सिपना नदीकाठावर आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकले जात असल्याने नागरिक व भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेळघाटातील हे पुरातन शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. मात्र मंदिर परिसरात स्वच्छते ऐवजी दुर्गंधी आणि घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील प्लास्टिक, भाजीपाला, टाकाऊ साहित्य तसेच मांसाचे अवशेष खुलेआम फेकले जात असल्याने परिसराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे हा भाग जंगलालगतचा असून सडलेल्या मांसाच्या वासामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राणी मंदिर परिसरात किंवा जवळील राष्ट्रीय महामार्गावर येण्याचा धोका निर्माण झाला असून भविष्यात मानवी-वन्यजीव संघर्ष अथवा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिपना नदी ही मेळघाटच्या पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाची मानली जाते. नदीकाठावर कचरा व मांसाचे अवशेष टाकल्याने जलप्रदूषणाचा धोका वाढला असून याचा परिणाम नदीतील जीवसृष्टी आणि जैवविविधतेवर होण्याची शक्यता आहे. भाविकांनीही या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हरिसाल ग्रामपंचायत, वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने संयुक्तपणे तातडीने पाहणी करून कचरा हटवावा, मांसाचे अवशेष टाकण्यास प्रतिबंध करावा, दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि आठवडी बाजारासाठी कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मेळघाटची ओळख निसर्ग, वन्यजीव, नदी आणि धार्मिक स्थळांमुळे आहे. ही ओळख कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मलिन होऊ नये, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून व्यक्त होत आहे. कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या मते, हा प्रश्न केवळ अस्वच्छतेचा नसून पर्यावरण, वन्यजीव संवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेशी निगडित आहे. आठवडी बाजारातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी वनक्षेत्रात अशा प्रकारचा कचरा टाकला जात असल्यास वन विभागानेही याची गंभीर दखल घेऊन नियमित पाहणी व कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *