Headlines

धामोडी पारधी बेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था:दीड किलोमीटरच्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी




दर्यापूर तालुक्यातील धामणा गावातील पारधी बेड्याकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शासनाच्या ‘आदर्श गाव’ आणि ‘स्मार्ट सिटी’ सारख्या योजना असल्या तरी, या शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या गावाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धामणा गाव धामोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या गावाला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाही. नागरिकांना धामोडी ते तोंगलाबाद असा प्रवास करून, तिथून पुढे दीड किलोमीटर खडतर मार्गाने जावे लागते. हा दीड किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे, ज्यामुळे गाव विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. या गावात साधारणतः ५० घरे असून सुमारे १५० लोक राहतात. धामोडी आणि तोंगलाबाद या दोन गावांच्या मध्यभागी नदीकिनारी हे लहानसे गाव वसलेले आहे. गावापर्यंत पोहोचणारा रस्ता पूर्णपणे खडतर आणि खड्डेमय झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बंगाली काटे वाढल्याने प्रवास करणे धोकादायक बनले आहे. गावाबाहेर किंवा दर्यापूर, अकोला येथे जाण्यासाठी नागरिकांना तोंगलाबाद गावातूनच जावे लागते. मात्र, याच मार्गावर रस्ता नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या परिसरातील धामोडी आणि तोंगलाबाद येथील शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत युवा सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय आदिवासी पारधी विकास बहुउद्देशीय संघटनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पवार यांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील काटे काढून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास सर्व गावकरी तहसील कार्यालयावर उपोषण करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *