Headlines

निवृत्त एसीपीवर सुनेचा छळ, शारीरिक संबंधांची मागणी:पती, सासू, नणंदांसह सात जणांवर गुन्हा दाखल; कोंढवा पोलिसांकडून तपास




पुण्यात एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तावर (एसीपी) सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पती, सासू आणि नणंदांसह सात जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ३० वर्षीय विवाहितेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. निवृत्त एसीपी सुरेश रामचंद्र घाडगे, त्यांचा मुलगा विक्रांत घाडगे, पत्नी सुनंदा घाडगे, नणंद स्नेहल सर्जेराव, प्रविण सर्जेराव, वैशाली राऊत आणि विक्रम राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून विक्रांत घाडगे यांचे स्थळ आले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये विमाननगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा झाला, तर एप्रिल २०२२ मध्ये त्यांचा विवाह सासवड येथे पार पडला. साखरपुडा आणि विवाहाचा सर्व खर्च तसेच मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने मुलीच्या पालकांकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाहानंतर सासूने फिर्यादीचे सर्व दागिने स्वतःकडे ठेवले. पती घरातून बाहेर जाताना पत्नीला घरात कोंडून ठेवत असे. तिला नोकरी करण्यापासून रोखण्यात आले आणि तिची सोशल मीडिया खातीही बंद करण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, माहेरचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांचाही अपमान केला जात होता, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीनुसार, निवृत्त एसीपी असलेले सासरे सुरेश घाडगे वारंवार धमक्या देत असत. “मी एसीपी होतो, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला माहीत आहे,” असे सांगून ते दडपण आणत होते. विरोध केल्यास कोयत्याने कापून टाकण्याची धमकीही त्यांनी दिली होती, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. याव्यतिरिक्त, पती, सासू आणि नणंदांकडून विविध कारणांवरून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. सासऱ्यांनी शारीरिक संबंधांची मागणी केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *