Headlines

बैठकीत खाण्यापेक्षा बांधावर खा!:हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांनाच दिली काजू-बदामाची प्लेट; दत्तात्रय भरणेंचा ताफा अडवला




मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत पिकांची पाहणी केली. मात्र, यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना एका बशीत काजू-बदाम भरून दिले. नांदेडमधील दुष्काळी आढावा बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधी काजू-बदाम खात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना काजू-बदाम देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी ‘बैठकीत बसून काजू-बदाम खाऊ नका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ठोस उत्तर द्या,’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी भरणेंना जाब विचारला. ‘काजू-बदाम खाऊ नका, ठोस उत्तर द्या’ यंदा पावसाने सुरुवातीला काही काळ चांगली हजेरी लावली असली, तरी त्यानंतर मोठा खंड पडल्याने राज्यातील अनेक भागांत पिकांवर संकट आले आहे. काही भागांत उभी पिके करपली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जात असल्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाई, तातडीची आर्थिक मदत, कर्जमाफी तसेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. नांदेडमध्येही कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. हिंगोलीमध्ये पाहणीसाठी आलेल्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर काजू-बदामाची बशी ठेवत नांदेडमधील बैठकीतील प्रकाराचा निषेध केला. ‘आमची पिके करपली आहेत. आमच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत बैठका घेऊन काजू-बदाम खाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्या,’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. हिंगोली जिल्ह्यातील टाकळगाव परिसरात नुकसानीची पाहणी करताना हा प्रकार घडला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह काही शेतकऱ्यांनीही कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान निषेध व्यक्त केला. भरणेंनी दिले मदतीचे आश्वासन शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. नांदेडमधील आढावा बैठकीत अनेक आमदार आणि खासदारांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती दिली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत, हातातून पीक गेले आहे. या पिकांवर शेतकऱ्यांनी अनेक स्वप्ने पाहिली होती; मात्र ती आता भंग झाली आहेत,’ असे भरणे यांनी म्हटले. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडून ज्या-ज्या योजनांमधून मदत करता येईल, त्या माध्यमातून मदत केली जाईल. ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ अशी ग्वाही भरणे यांनी दिली. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याबाबतही नियोजन दुष्काळी परिस्थितीत केवळ पिकांचेच नुकसान होत नाही, तर जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा कमी पडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे भरणे यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या आणि त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याआधीही सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धोरण तयार केले जाईल, असे सांगितले होते. वसमत तालुका वगळल्याची यादी बनावट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियावर दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी फिरत असून त्यातून वसमत तालुका वगळल्याची चर्चा रंगली होती. त्यावर खुलासा करताना कृषी मंत्री म्हणाले, “शासनाकडून दुष्काळातून कोणताही तालुका वगळल्याची अधिकृत यादी प्रसिद्ध झालेली नाही. व्हॉट्सॲपवर फिरणारी यादी 100 टक्के दिशाभूल करणारी आणि फेक आहे. अशी खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आत्तापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार हिंगोलीतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिक आमदार चंद्रकांत नवघरे आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याच्या मुद्द्यावर कृषीमंत्र्यांनी भूमिका मांडली. “शेतकऱ्यांचा विरोध आणि जमिनीच्या मोजणीचा हा विषय मला आजच स्थानिक पातळीवर समजला. इथल्या शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. मी स्वतः या तीव्र भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालेन आणि शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असा मार्ग काढू,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, पोळा सणाच्या दिवशी आत्महत्या केलेल्या महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन पूर्णपणे सहभागी असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या कुटुंबाची भेट घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामावरून वाद दरम्यान, शनिवारी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काजू-बदाम खात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत असताना आढावा बैठकीत सुकामेवा दिल्याने या प्रकारावरून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना काजू-बदाम देत आपला निषेध नोंदवला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवरून सरकारसमोरचा दबाव वाढला आहे. हेही वाचा… संजय राऊत जेवढं तोंड उघडतील, तेवढा मालकाचा मुलगा अडचणीत येईल!:नितेश राणेंचा थेट इशारा- गप्प बसा अन् आदित्यला सुरक्षित ठेवा! “खासदार संजय राऊत रोज सकाळी उठून वेड्यासारखी बडबड करत आहेत. ते आणि उबाठा गटाचे नेते जेवढे तोंड उघडतील, तेवढा त्यांच्या मालकाचा मुलगा म्हणजेच आदित्य ठाकरे अधिक अडचणीत येणार आहे. सतीश सालियन हे आपल्या मृत मुलीच्या न्यायासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार लढा देत आहेत. यात कोणीही राजकारण करू नये. राऊतांनी जास्त तोंड उघडल्यास पोलिसांना आदित्य ठाकरेंना लवकरच अटक करावी लागेल,” असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *