![]()
हिंगोली शहरालगत खटकाळी बायपास येथे स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली ग्रामीण पोलीस यांच्या पथकाने शनिवारी ता १९ सकाळी तब्बल तीन तासाच्या नाकाबंदीनंतर एक स्कार्पिओ वाहन पकडले. वाहनातील गुटखा व वाहन असा १७.९०लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड कडून एका स्कार्पिओ वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा विदर्भाकडे नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी तातडीने पोलीस पथक स्थापन केले हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उप निरीक्षक राहुल घुले, श्रीदेवी वाग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडितकर, बापूराव चव्हाण, सुधीर ढेंबरे, नंदू जाधव, विष्णू चव्हाण, राजू गुठे, शंकर गायकवाड, इडॊळे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव, धनंजय क्षीरसागर यांचे पथक खटकाळी बायपास येथे तैनात केले. यामध्ये काही कर्मचारी गणवेशात तर काही कर्मचारी साध्या वेशात तैनात होते. आज सकाळी सहा वाजल्यापासून या पथकाने नांदेड कडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. शहरालगत खटकाळी बायपास येथे वाहन आल्यानंतर पोलिसांना पाहून वाहन चालक पळून जाऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. सकाळी नऊ वाजता एक संशयित स्कार्पिओ पोलिसांनी थांबवली. पोलिसांनी वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती आढळून आली. यामध्ये सुगंधित पान मसाला तसेच गुटखा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी स्कार्पिओ वाहन व गुटखा असा १७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. पोलिसांनी वाहन चालकाची प्राथमिक चौकशी केली असता त्याने सदरील गुटखा नांदेड येथून आणण्याचे सांगितले तसेच गुटखा विदर्भात दिला जात असल्याचेही प्राथमिक चौकशी सांगितले. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Source link
हिंगोलीत पोलिसांची मोठी कारवाई:तब्बल 17.90 लाखांचा गुटखा आणि स्कॉर्पिओ जप्त; तीन तासांच्या नाकाबंदीनंतर यश