Headlines

'गोकुळ'च्या आखाड्यात भाजप आक्रमक:सर्व 25 जागांवर उमेदवार देण्याची तयारी, बैठकीत नेमके काय ठरले? वाचा सविस्तर




गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपावरून आधीच संघर्ष सुरू असताना, आता भाजपने सर्वच्या सर्व 25 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर आमदार अमल महाडिक यांनी ही माहिती दिली. भाजपच्या या निर्णयामुळे जागावाटपाचा तिढा अधिकच वाढला असून, आगामी काळात महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या भाजप आमदार आणि खासदारांच्या बैठकीत, महायुतीमध्ये भाजपसाठी सर्वाधिक जागांची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर, गोकुळमध्ये सर्वाधिक ठराव पाठीशी असणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून त्याविषयी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. महायुतीतील अंतर्गत कलह आणि भाजपची आक्रमक भूमिका पात्र-अपात्र संस्थांच्या राजकारणावरून हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांच्यावर थेट हल्लाबोल करत, “आमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप केला. एकीकडे हा वाद सुरू असतानाच भाजपने सर्व जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, भाजप आमदार शिवाजी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातही गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू असून पाटील यांना वगळून महायुतीचे पॅनेल तयार करण्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आता भाजप नेत्यांनी थेट सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी चालवली असल्याचे चित्र आहे. बिनविरोध निवडणुकीची शक्यता फेटाळली दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी गोकुळ निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. “गोकुळची निवडणूक बिनविरोध होईल असे मला वाटत नाही. नेत्यांच्या दाव्या-प्रतिदाव्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य आहे. महायुती म्हणून निवडणूक होईल आणि महायुतीच जिंकेल,” असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अद्याप कोणतीही बैठक झालेली नसून, 7 ऑक्टोबरपूर्वी त्यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अपात्र संस्थांच्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये 75 टक्के संस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यच्या होत्या, तर 15 टक्के संस्था काँग्रेसच्या होत्या; त्यामुळे या संस्था वाचवण्याचा प्रयत्न आम्हालाच करावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *