Headlines

कसबा पेठेतील हनुमान मंडळाच्या देखाव्यातून उलगडला पुण्याचा इतिहास:'पुनवडी' देखाव्यातून शाहीरांनी मंडळाला दिल्या शताब्दीच्या शुभेच्छा; जुन्या पुण्याची रचना साकारली




कसबा पेठेतील श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठानच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘पुनवडी’ हा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात उभारलेल्या चावडीवरून शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या सेवाव्रती शाहिरांनी ऐतिहासिक पोवाड्यांचे सादरीकरण करत मंडळाला शताब्दीच्या शुभेच्छा दिल्या. ‘शाहिरी मुजरा गणरायाला’ या उपक्रमांतर्गत आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहकाऱ्यांनी विविध रचना सादर केल्या. पुण्याचा सांगतो इतिहास, सकल जनास, घ्यावा ध्यानास, पुण्यपतन म्हणती याला, पुनवडी असा उल्लेख झाला, आता पुणे नाव शोभे ज्याला, हा जी जी जी… अशा पोवाड्यातून पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेण्यात आला. कमी जागेत जुन्या पुण्याची रचना प्रभावीपणे साकारण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर यांनी या देखाव्याची रचना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत महाडिक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रबोधिनीच्या शाहिरी फडाचे स्वागत केले. कार्यक्रमात शाहिरी गण, मुजरा, राजमाता जिजाऊंचा पोवाडा, पुनवडी अर्थात पुण्याचा पोवाडा, अफझल खान वध आणि महाराष्ट्र गीत अशा विविध रचना सादर करण्यात आल्या. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे सेवाव्रती शाहीर आरव नवरे, प्रेम दुसाने, आर्या दरेकर, प्रीती खोसे यादव आणि आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी विविध रचना सादर केल्या. पारंपरिक पोशाखातील शाहिरी सादरीकरण आणि चावडीवर उभारलेला ‘पुनवडी’चा देखावा यामुळे प्रेक्षकांना जुन्या पुण्याच्या वातावरणाची अनुभूती मिळाली. मंडळाच्या वतीने शताब्दी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे देखील नियोजन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *