![]()
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरुणीच्या बॅगेतून ३० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २३ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी घोरपडी गावातील एका सोसायटीत राहते. ती बँकॉकमधून विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तिने तिच्याकडील पिशवी तपासली. तेव्हा पिशवीला लावलेले बॅगेज टॅग उघडलेले दिसले. तरुणीने पिशवीत पाचशे रुपयांच्या ६० नोटा ठेवल्या होत्या. तपासणी केल्यावर पिशवीतील ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे उघड झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. जोगदंडे करत आहेत. दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एका प्रवाशाला लुटल्याची दुसरी घटनाही घडली आहे. प्रवाशाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इरफान निजाम मोहम्मद (वय २७, रा. सुपा, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इरफान मूळचे तेलंगणातील निजामाबादचे रहिवासी आहेत. १८ सप्टेंबर रोजी ते रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्सल कार्यालयाजवळ असलेल्या झाडाखाली आराम करत होते. त्यावेळी तीन चोरटे तिथे आले आणि ‘आमच्याकडे रागाने का बघतो’ असे विचारून त्यांनी इरफानशी वाद घालण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील तीन हजार रुपयांची रोकड लुटून पळ काढला. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक एन. धुमाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुणे विमानतळावर तरुणीच्या बॅगेतून 30 हजारांची रोकड चोरी:विमानातून उतरल्यावर प्रकार उघड, पोलिसांत तक्रार