छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा बदल घडवून आणणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे. शेंद्रा येथून सुरू होऊन बजाजनगरमधील ओएसिस चौकाच्या पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर आता त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. शेंद्रा ते बजाजनगरपर्यंत सलग मार्ग शेंद्रापासून सुरू होणारा हा प्रस्तावित उड्डाणपूल केंब्रिजच्या पुढील भागातून पुढे जात बजाजनगर येथील ओएसिस चौकाच्या पुढे जाणार आहे. शहराच्या वाढत्या विस्ताराचा आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गासाठी आवश्यक असलेल्या आराखड्यावर सध्या अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील सर्वात लांब उड्डाणपूल? शिरसाट म्हणाले, शेंद्रा-केंब्रिज परिसरापासून सुरू होणारा हा उड्डाणपूल मराठवाड्यातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी त्याचा उल्लेख यापूर्वी अर्थसंकल्पाच्या वेळी सभागृहातही करण्यात आला होता. त्यामुळे घोषणेनंतर आता प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले. दोन ते तीन टप्प्यांत काम पूर्ण होणार 4 हजार कोटी रुपयांचा हा मोठा प्रकल्प एकाचवेळी पूर्ण करण्याऐवजी दोन ते तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तीन महिन्यांत टेंडर फ्लोट होण्याची शक्यता या प्रकल्पासाठीचा DPR तयार झालेला असून त्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यांत या कामाची निविदा अर्थात टेंडर फ्लोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्यास प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात होऊ शकते. जुने पूल पाडून नवीन अखंड पूल सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शिरसाट यांनी त्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी बांधण्यात आलेले पूल त्या वेळच्या गरजा आणि लोकसंख्येचा विचार करून उभारण्यात आले होते. मात्र, शहराची वाढ आणि वाहतुकीचा वाढलेला ताण पाहता हे पूल आता अपुरे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सगळे जुने पूल डिमॉलिश होतील’ सध्याचे पूल पाडून त्यांच्या जागी एका अखंड उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पुलांऐवजी एकसंध आणि सलग उड्डाणपूल उपलब्ध होणार आहे. या नव्या रचनेमुळे वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता अंमलबजावणीचा टप्पा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे. पुढील तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने आता या प्रकल्पाकडे संभाजीनगरकरांचे लक्ष लागले आहे. मात्र, ४ हजार कोटींच्या या मोठ्या प्रकल्पासाठी प्रशासकीय मंजुरी, निविदा आणि प्रत्यक्ष बांधकामाचा कालावधी याबाबत पुढील टप्प्यांत अधिक स्पष्टता येणार आहे. हेही वाचा.. उद्धव ठाकरेंना प्रशासनाची माहिती नाही, त्यांनी डायलॉगबाजी करू नये: दुष्काळाबाबत 5 ऑक्टोबरनंतर सरकार दिलासादायक निर्णय घेऊ शकते- संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांना प्रशासनाबद्दल काहीही माहिती नाही. काही गोष्टींच्या विशिष्ट गाईडलाईन्स ठरलेल्या असतात. सत्तेत असताना जे काही देऊ शकले नाहीत, ते आता केवळ बोंबलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी उगाच डायलॉगबाजी करू नये, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून दुष्काळाबाबत 5 ऑक्टोबरनंतर मुख्यमंत्री भरीव मदतीची घोषणा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सविस्तर वाचा
Source link
जुने पूल पाडणार, नवा 'अखंड' उड्डाणपूल उभारणार:छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 हजार कोटींच्या उड्डाणपुलाची लवकरच निविदा- संजय शिरसाट