Headlines

उत्सव:गणरायाच्या उत्साहात गौराईची भर; शेवगावात घराघरांत सजली आरास!




गणरायाच्या आगमनानंतर आता शेवगाव शहरासह तालुक्यात घराघरांत गौरीच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रातील महिलांच्या भावविश्वाशी जोडलेला महत्त्वाचा पारंपरिक उत्सव असून, सुवासिनी गौरीचे मनोभावे पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करीत आहेत. गौरीच्या आगमनामुळे शहर आणि तालुक्यातील वातावरण भक्तिमय झाले आहे. गौरीच्या स्वागतासाठी महिलांनी घरांची स्वच्छता करून आकर्षक सजावट केली आहे. फुलांच्या माळा, तोरणे, रंगीबेरंगी रांगोळ्या, विद्युत रोषणाई तसेच विविध वस्तूंच्या मांडणीने घराघरांत गौरीची आरास सजली आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गौरीची स्थापना करून पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. साडी, दागिने, फुलांचे हार आणि विविध अलंकारांनी गौराईला सजविण्यात आले आहे. गौरी पूजनानिमित्त घराघरांत विविध प्रकारचे नैवेद्य आणि पंचपक्वान्न तयार करण्यात येत आहेत. हळदी-कुंकू, ओटी भरणे आणि अन्य पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पारंपरिक वेशभूषेतील सुवासिनींच्या सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत आली आहे. नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराच्या भेटीगाठींमुळे सणाचा आनंदही द्विगुणित होत आहे. भावी निमगाव येथील जाधव कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गौराईची विशेष आरास केली आहे. गौरीच्या मुखवट्यांचा जिवंत देखावा साकारण्यात आला असून, दुसऱ्या दिवशी गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. अशा विविध कल्पक आरासींमधून महिलांची कलात्मकता आणि सर्जनशीलता दिसून येत आहे. काही घरांमध्ये बळीराजाची प्रतिकात्मक मांडणी करून शेती आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवले जात आहे. पारंपरिक पूजा-विधींसह धार्मिक कार्यक्रम गौरीचा उत्सव साधारणपणे तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी गौरीचे आगमन व स्थापना, दुसऱ्या दिवशी महापूजा व नैवेद्य, तर तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. या काळात पारंपरिक पूजा-विधींसोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गौरी-गणपतीचा उत्सव धार्मिक विधींसोबतच कुटुंबातील जिव्हाळा, महिलांचा सहभाग आणि पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या प्रथा-परंपरांचे जतन करणारा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत गौरीच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *