![]()
तालुक्यातील उक्कलगाव येथे युवकाचा मृतदेह घरात आढळून आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. आशिष ऊर्फ लाल्या विजय पारखे (वय २९) याचा नैसर्गिक मृत्यू नसून, त्याच्या मोठ्या भावांनीच त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिली. गुरुवारी (१७ सप्टेंबर) आशिष पारखे याचा मृतदेह राहत्या घरी आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विशाल खैरे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे, राम शिखरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मानेवरील जखमांवरून पोलिसांना घातपाताचा संशय आला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे पाठविण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या उत्तरीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात कानाच्या बाजूला टणक हत्याराने मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून आशिषचे भाऊ अक्षय पारखे व अनिकेत पारखे यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक खैरे यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे करीत आहेत.
Source link
"त्या'मृत्यूचे गूढ उकलले:सख्ख्या भावांनीच केला खून