Headlines

उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाला पुण्यात सुरुवात:सितार पंचक, बहुरंग नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली




सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एफटीआयआयच्या सहकार्याने आयोजित ‘सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव २०२६’ ला शुक्रवारी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एफटीआयआयच्या नवीन सभागृहात सुरुवात झाली. यावेळी एफटीआयआय पुणेचे कुलगुरू धीरज सिंह, कन्नड संघ, पुणेचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्षा इंदिरा सालियन, सचिव मालती कलमाडी, धारवाड घराण्याचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान, एफटीआयआयचे कुलसचिव प्रतीक जैन, स्वित्झर्लंड येथील टेन्थपिन मॅनेजमेंट कन्सल्टंट्सचे भागीदार व संस्थापक मायकेल श्मिट आणि सुहाना बसंत फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रईस खान आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात धारवाड घराण्यातील नामवंत सतारवादक उस्ताद छोटे रहिमत खान, उस्ताद रफीक खान, उस्ताद शफीक खान, रईस बाले खान आणि मन्सूर खान यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘सितार पंचक’ सादरीकरणाने झाली. त्यांनी राग मारू बिहागमध्ये आलाप, जोड आणि चौतालातील गत तसेच राग सोहनीमधील तीनतालातील गत व झाला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाला हेमंत जोशी आणि सोहम गोराणे यांनी तबल्यावर साथ दिली. यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते निरुपमा आणि राजेंद्र तसेच अभिनव टीम, बेंगळुरू यांचा ‘बहुरंग’ हा वैशिष्ट्यपूर्ण नृत्याविष्कार सादर झाला. पुण्यात प्रथमच सादर झालेल्या या नृत्यरचनेत कथक, करणा आणि नाट्यशास्त्रातील हालचालींचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. भारतीय संस्कृती, कला आणि तत्त्वज्ञानाचे वैभव विविध रंगछटांमधून प्रभावीपणे उलगडण्याचा हा एक उत्तम प्रयत्न होता. ऊर्जा, उत्साह आणि अभिनव संकल्पनांनी परिपूर्ण अशा या नृत्यरचना आकर्षक वेशभूषा, नेत्रदीपक प्रकाशयोजना आणि विशेषतः या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या संगीतासह सादर करण्यात आल्या. या संगीताची निर्मिती प्रवीण राव, म्हैसूर मंजनाथ, प्रवीण गोडखिंडी आणि तरुण भट्टाचार्य यांनी केली आहे. सदर महोत्सव येत्या २१ जूनपर्यंत असून संगीत रसिकांसाठी तो विनामूल्य खुला आहे. महोत्सवात शनिवारी पं. सुधाकर चव्हाण यांचे गायन, पं. अभय रुस्तुम सोपोरी यांचे संतूरवादन व पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. रविवारी सकाळच्या सत्रात उस्ताद अरशद अली खान, पं. जयतीर्थ मेवुंडी आणि पं. प्रवीण गोडखिंडी यांची गायन–बासरी जुगलबंदी सादर होईल. सायंकाळच्या सत्रात अभिषेक बोरकर आणि मोहसिन खान यांची सरोद–सितार जुगलबंदी होणार असून त्यानंतर विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि पद्मश्री पं. वेंकटेश कुमार यांच्या सादरीकरणांनी महोत्सवाचा भव्य समारोप होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *