Headlines

कांडली फाटा येथे शक्तिपीठ विरोधात आंदोलन:सेनगावात कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर मोर्चा, गोरेगावात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन




शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासह इतर मागण्यांवर घोषणाबाजी करीत शेकडो शेतकऱ्यांनी कळमनुरी तालुक्यातील कांडलीफाटा येथे मंगळवारी ता. १६ दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. तसेच सेनगाव येथे कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर आ्ंदोलन झाले तर गोरेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पत्रादेवी ते पवनार हा सुमारे ८०२ किलो मिटर अंतराचा शक्तिपीठ महामार्ग शासनाने मंजूर केला आहे. या महामार्गावर करोडो रुपये खर्च होणार असून ज्योतिर्लिंग व शक्तिपीठे या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग शासनाचा ड्रिम प्रोजक्ट आहे. मात्र या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत केल्या जाणार असून त्या संदर्भात शासनाने अधिसुचना देखील प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, या महामार्गासाठी जमीन संपादीत केल्यास अल्पभूधारक शेतकरी अडचणीत येणार आहेत. उत्पन्नाचे साधन शिल्लक राहणार नसल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांकडून तिव्र विरोध केला जात आहे. कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, कांडली, आखाडा बाळापूर यासह परिसरातील गावांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी हजारो हेक्टर जमीन संपादीत होणार आहे. सदरील महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज रास्तारोकोची हाक दिली होती. त्यासाठी संघर्ष समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, आज कांडलाफाटा येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासह इतर घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. हातात फलक घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी आकरा वाजता सुरु झालेला रास्ता रोको दुपारी साडेबारा वाजता मागे घेण्यात आला. यावेळी प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शासनाने आवश्‍यकता नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा यापेक्षाही तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दिड तास विस्कळीत झाली होती. सेनगाव येथे कर्जमाफीसाठी ट्रॅक्टर आंदोलन सेनगाव येथे ठाकरे गटाच्या वतीने सरसगट कर्जमाफीसाठी मंगळवारी ता. १६ सकाळी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व पदाधिकारी ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन तहसील कार्यालयावर दाखल झाले. यावेळी सरसगट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. धनगरवाडी येथे कर्जमुक्तीच्या अध्यादेशाची होळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनात पाठिंब दर्शविण्यासाठी सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे सरपंच विनोद विरकर, सुरेश खडसे, संजय कुरवाडे, गजानन खडसे, सुरेश कुरवाडे, भगवान बोरकर, कैलास खडसे, सचिन कुरवाडे, गजानन गायकवाड, रामकृष्ण खोरणे यांची उपस्थिती होती. गोरेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरसगट कर्जमाफीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सतीष इडोळे, प्रविण मते, मनोहर सावके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *