![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटातील फूट ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून देशात विरोधी पक्ष कमकुवत करण्याच्या मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही या घडामोडींना “ऑपरेशन बाजार” असे संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाच्या दिशेने पाऊल टाकल्याने महाविकास आघाडीत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. ‘ऑपरेशन टायगर, लोटस की लायन माहिती नाही; पण फूट पडली हे स्पष्ट’ राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, “ऑपरेशन लोटस, टायगर, लायन… मला या जनावरांची नावे माहिती नाहीत. पण शिवसेना उद्धव ठाकरे गटात फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. त्यामुळे पक्षात विभाजन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.” ‘परिसीमन आणि घटनादुरुस्तीसाठी विरोधकांना लक्ष्य?’ पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी भाजपच्या राजकीय उद्दिष्टांवरही प्रश्न उपस्थित केले. “नरेंद्र मोदी सरकारला परिसीमन (Delimitation) प्रक्रियेद्वारे उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व वाढवायचे आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधानात मोठे बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात एका व्यक्तीची हुकूमशाही निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असून लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘ईडीची भीती आणि पैशांचे राजकारण’ विरोधी पक्षांतील नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. “एका बाजूला ईडीसारख्या यंत्रणांची भीती दाखवली जाते आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक प्रलोभने दिली जातात. या दुहेरी कचाट्यात विरोधी पक्षांतील अनेक नेते अडकत आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्षात आलात तर खोके मिळतील, कंत्राटे मिळतील आणि त्यातून कमिशनही मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला “प्रचंड भ्रष्टाचारी सरकार” म्हणत त्यांचे एकमेव उद्दिष्ट सत्ता टिकवणे आणि वाढवणे असल्याचा आरोप केला. रोहित पवारांचा टोला- ‘ऑपरेशन बाजार’ दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाहीच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत लिहिले, “लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही तर ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल. आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे आता लोकंच ठरवतील. एकेका खासदाराचा रेट 85 कोटी..? संजय राऊतांनी 50 कोटींच्या डीलचा दावा केला असताना, रोहित पवारांनी हा आकडा आणखी पुढे नेला आहे. त्यांनी थेट सवाल उपस्थित करत विचारले, एकेका खासदाराचा रेट 85 कोटी..? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.” येथे वाचा सविस्तर बातमी महाविकास आघाडीत चिंता, भाजपवर आरोपांची सरबत्ती ठाकरे गटातील फुटीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपवर सातत्याने आरोप केले जात आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणि सत्तेची प्रलोभने वापरून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर भाजपकडून हे आरोप फेटाळले जात असून, पक्षांतील अंतर्गत नाराजी आणि नेतृत्वावरील असंतोषामुळेच नेते पक्ष सोडत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून, या घडामोडींवर देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Source link
‘देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न!’:ठाकरे गटातील फुटीनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप, परिसीमन आणि घटनादुरुस्तीसाठी विरोधक लक्ष्य?