![]()
दर्जेदार मराठी चित्रपट तयार होत असले तरी प्रभावी वितरण व्यवस्थेअभावी त्यांना अपेक्षित प्रेक्षक मिळत नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मीडिया शिपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आता थेट जगाचे मार्केट’ ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे मराठी चित्रपटांसाठी जागतिक वितरणाच्या नव्या संधी खुल्या झाल्या असून, १०० हून अधिक देशांतील बाजारपेठ आणि १८०० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विशेष भेट दिली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मीडिया शिपर्सचे सहसंस्थापक उदय घारे आणि ज्येष्ठ वितरण तज्ज्ञ अनंत नाईक यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी चित्रपट वितरणावरील परिसंवादात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे आणि दिग्दर्शक अजय सिंह यांनी सहभाग घेतला. त्यांनी मराठी चित्रपटांच्या जागतिक वितरणाच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, उपाध्यक्ष धनाजी यमकर, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संचालक अजित शिरोळे, राज काझी, वासू पाटील आणि मीडिया शिपर्सचे शीतल वैद्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डोळस यांनी केले. मेघराज राजेभोसले यांनी सांगितले की, मराठी चित्रपट निर्मिती आता सोपी झाली असली तरी वितरण ही सर्वात मोठी अडचण आहे. मीडिया शिपर्सच्या सहकार्यामुळे मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ आणि १८०० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार असून, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मीडिया शिपर्सचे सहसंस्थापक उदय घारे यांनी चित्रपट निर्मितीबरोबरच त्याची ब्रँड व्हॅल्यू, लक्ष्य बाजारपेठ आणि डिजिटल वितरणाचे नियोजन महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. केवळ थिएटर व्यवसायावर अवलंबून न राहता ओटीटी, डिजिटल हक्क आणि आंतरराष्ट्रीय विक्री यावरही निर्मात्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ वितरण तज्ज्ञ अनंत नाईक यांनी चित्रपटाच्या निर्मितीपासूनच वितरण आणि मार्केटिंगचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. चित्रपट कोणत्या बाजारपेठेत विकला जाऊ शकतो याचा अभ्यास करून आगाऊ करार केल्यास निर्मात्यांना अधिक व्यावसायिक यश मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
मराठी चित्रपटांना आता जागतिक बाजारपेठ मिळणार:मीडिया शिपर्स, चित्रपट महामंडळाच्या कार्यशाळेत वितरणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन