![]()
जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी अशा चारा पिकांची लागवड करावी, ज्यातून मुख्य शेतमाल आणि जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चारा दोन्ही उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा ‘मुरघास’ किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. पशुसंवर्धन विभागामार्फत ‘एल निनो’च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर नंबरवरुन माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करून पशुधन आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवता येईल, असे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
Source link
एल निनोमुळे चारा टंचाईची शक्यता, पशुपालकांनी लक्ष द्यावे:पशुधन व दुग्धोत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक