![]()
शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि बोचरी टीका केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे दलाल असून भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. तसेच ठाकरे गटाचे सध्या सहा खासदार फुटले असून, उरतलेले खासदारही लवकरच फुटतील असे नरेश म्हस्के म्हणालेत. शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सध्या जवळपास पूर्ण झाल्याचे समजते आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड पुकारत वेगळा गट स्थापन केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार यांनी सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केल्यानंतर आता या आरोपांना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरे गटासंदर्भात खळबळजनक दावे केलेत. नेमके काय म्हणाले नरेश म्हस्के? नरेश म्हस्के म्हणाले की, “ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत एकप्रकारे संजय राऊत यांचे थोबाडच फोडले आहे. उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेसशी शय्यासोबत करत असून, ते स्वतःचा पक्ष संपवून केवळ काँग्रेस वाढवण्याचे काम करत आहेत.” संजय राऊत म्हणजे काँग्रेसचे दलाल नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ला चढवत त्यांना ‘काँग्रेसचे दलाल’ असे संबोधले. “संजय राऊत नावाचा दिवा आता पूर्णपणे विझत चालला आहे; आणि दिवा विझण्यापूर्वी जशी जास्त फडफड होते, तशीच फडफड सध्या राऊत यांची सुरू आहे,” असा टोला म्हस्के यांनी लगावला. संजय राऊत यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नरेश म्हस्के म्हणाले, “संजय राऊत यांचा दम फक्त त्यांच्या तोंडात आहे, मात्र राजकारणात ताकद मनगटात असावी लागते. गेल्या वेळी स्वतः एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर आमच्या आमदारांनी मतदान केले, म्हणूनच संजय राऊत खासदार होऊ शकले, हे त्यांनी विसरू नये. आता ठाकरे गटाकडे केवळ तीन खासदार शिल्लक राहिले आहेत; ते तरी किती काळ तुमच्यासोबत राहतात, ते आता बघाच!” ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? भविष्यात उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असा मोठा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला. “पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार, याच भीतीपोटी ठाकरे गटाच्या खासदारांनी ही बंडखोर भूमिका घेतली आहे,” असे ते म्हणाले. तसेच, संजय राऊत यांनी जाणीवपूर्वक या खासदारांची उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही थेट भेट होऊ दिली नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. दानवेंच्या फॉर्मवर सही करायला आमदार तयार नव्हते ठाकरे गटातील अंतर्गत वादावर बोलताना नरेश म्हस्के यांनी विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारीचा दाखला दिला. ते म्हणाले, “अंबादास दानवे यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांचे १० आमदारसुद्धा तयार नव्हते. ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हेदेखील या सहीसाठी राजी नव्हते. अखेर पुण्यात एक महत्त्वाची बैठक असल्याचे खोटे कारण सांगून त्या सर्व आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आणि दबावाखाली त्यांच्याकडून त्या फॉर्मवर सह्या करून घेण्यात आल्या.”
Source link
संजय राऊत काँग्रेसचे दलाल!:ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, उरलेले खासदारही लवकरच फुटतील; नरेश म्हस्के यांचा दावा