Headlines

बनावट कागदपत्रे तयार करून अनुदान लाटल्याचे प्रकरण:तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, विभागीय चौकशी होणार




सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील लखन सर्जेराव नाईक इंग्रजी शाळेने बनावट कागदपत्रे तयार करून ५.०८ कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता तत्कालीन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने दिले आहेत. या प्रकरणात तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील लखन सर्जेराव नाईक इंग्रजी शाळेने बनावट कागदपत्रे सादर करून राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजने अंतर्गत निवड करून घेतली. त्यानंतर या ठिकाणी सन २०२१-२२ पासून ते सन २०२५-२६ पर्यंत निवासी विद्यार्थी दाखवून ५.०८ कोटी रुपयांचे अनुदान लाटले. मात्र सदर अनुदानाचे प्रस्ताव सादर करतांना सहाय्यक आयुक्त तसेच प्रादेशिक उपसंचालकांनी शाळेला भेट देऊन तपासणी करणे अपेक्षित आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्या प्रस्तावाची प्रादेशिक उपसंचालकांनी शाळेला भेट देऊन पाहणी करावी तसेच त्यानंतरच अनुदानासाठीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे अपेक्षीत आहे. मात्र या ठिकाणी सर्वच टप्प्यावर अधिकाऱ्यांनी कामात कुचराईपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने स्थापन केलेल्या चौकशी पथकामध्ये सदर बाब स्पष्ट झाली असून तत्कालीन अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमुद केले आहे. यावरून शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने संचालक कार्यालयाला पत्र पाठवून तत्कालीन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या या पत्रानंतर आता संचालक कार्यालयाने तत्कालीन अधिकारी कोण होते तसेच कोणी कामाच कुचराई केली याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे हि योजना सन २०२३ पर्यंत समाज कल्याण विभागामार्फत राबवली जात होती त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही कार्यालयाचे तत्कालीन अधिकारी गोत्यात येणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *