![]()
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. विशेषतः ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असे बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी सांगितले. यावर्षी मान्सूनचे आगमन झाले असले तरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. काही भागात झालेल्या हलक्या पावसामुळे अनेक शेतकरी पेरणीची तयारी करत आहेत. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे उगवणीत अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगून पावसाची स्थिती पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कोयले यांनी सांगितले. खरीप हंगामातील बहुतांश पिकांची पेरणी जून महिन्यात करता येते. मात्र मूग आणि उडीद या पिकांची पेरणी जून महिन्यानंतर करू नये, कारण उशिरा पेरणी झाल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे या पिकांच्या लागवडीचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, बार्शी तालुक्यासारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या व आवर्षणप्रवण भागात बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) किंवा टोकण पद्धतीने पेरणी करणे अधिक फायदेशीर ठरते. या पद्धतीमुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जाते, जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो आणि पिकांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होते. परिणामी कमी पावसातही पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. बीबीएफ पद्धतीमध्ये उंच वाफे आणि सरी तयार केल्या जात असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो तसेच दुष्काळी परिस्थितीत ओलावा टिकून राहतो. टोकण पद्धतीत बियाण्यांचा अपव्यय कमी होतो, झाडांची संख्या योग्य राहते आणि खतांचा परिणामकारक वापर होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा, तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पीकनिहाय शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी केले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जूनमध्ये पाऊस समाधानकारक होऊ शकतो, मात्र जुलै-ऑगस्टमध्ये पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खरीप पिके, जलसाठे आणि पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने यंदाचा पाऊस कमी राहण्याचा अंदाज वर्तवला. एल निनोमुळे यंदा कमी पाऊस, खंड पडणार
Source link
100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका:बीबीएफ व टोकण पद्धतीचा अवलंब करा, कृषी अधिकारी कोयले यांचे आवाहन