![]()
वैजापूर तालुक्यातील पारसोडा येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी (२५ ऑगस्ट) भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ह.भ.प. मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. सांगता सोहळ्यासाठी तब्बल ५० हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याने पारसोडा नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘देव प्रेमाने बांधला जातो, संपत्तीने नाही’ काल्याच्या कीर्तनासाठी मधुसूदन महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या “विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता॥” या अभंगाची निवड केली होती. या अभंगावर निरूपण करताना महाराजांनी भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-गोपाळांच्या लीलांचे अतिशय सुंदर वर्णन केले. ते म्हणाले, “विश्वाचा निर्माणकर्ता आणि सर्वांचा स्वामी असलेला देव भक्तांच्या प्रेमापुढे स्वतःला लहान करून घेतो. वृंदावनातील गोपींची भक्ती निष्काम होती, म्हणून देव त्यांच्या प्रेमात रमला. देव हा नेहमी भक्तीने आणि प्रेमाने मिळतो, तो कधीही संपत्तीने किंवा अहंकाराने मिळत नाही. निष्काम भक्ती हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची प्राप्ती करून देते,” असा अमूल्य उपदेश महाराजांनी उपस्थित भाविकांना दिला. १० मिनिटांत ५० हजार भाविकांना महाप्रसाद या सप्ताहासाठी तब्बल ४० एकर जागेवर भव्य कीर्तन मंडप, दर्शन मंडप, भोजन व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या होत्या. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे अत्यंत चोख नियोजन पाहायला मिळाले. तब्बल १११ क्विंटल बुंदी आणि ३० क्विंटल घुगरीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे, पंगतीत बसलेल्या ५० हजार भाविकांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवघ्या १० मिनिटांत जागेवरच प्रसादाचे वाटप करण्यात आले. या शिस्तबद्ध नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५ कोटींचा निधी आणि विकासकामांच्या घोषणा या सांगता सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी पंढरपूर आणि आळंदी येथील संत बहिणाबाई मंदिर तसेच भक्तनिवासाच्या उभारणीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे मोठे आश्वासन दिले. यासोबतच शिऊर संस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मन्याड आणि शिवना प्रकल्पाचे पाणी बोर-दहेगाव मध्यम प्रकल्पात सोडावे, तसेच रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजना शासनाने ताब्यात घेऊन सुरू करावी, अशी मागणी मंत्री महाजन यांच्याकडे केली. या सोहळ्याला राज्यभरातून आलेले संत, महंत, लोकप्रतिनिधी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित बातमी वाचा.. वैजापूरमधील परसोड्यात एकादशीला भक्तीचा महासागर:संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहात 30 हजार भाविकांची उपस्थिती वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे सुरू असलेल्या ४७व्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला एकादशीच्या दिवशी भक्तीमय वातावरणात मोठी गर्दी झाली. नवव्या दिवशीच्या कीर्तन सेवेला सुमारे ३० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने परिसर दुमदुमून गेला. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी संत नामदेव महाराजांच्या ‘सर्वाभूती पाहे एक वासुदेव, अंतरीचा भाव जाणे तो देव’ या अभंगातून उपस्थित भाविकांना प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे एकच रूप पाहण्याचा संदेश दिला. देव केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसून प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे जात-पात, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद न करता प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे रूप पाहावे, असा उपदेश त्यांनी केला. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगरातील पारसोड्यात अवतरली पंढरी!:संत बहिणाबाई महाराज सप्ताहाची सांगता; काल्याच्या कीर्तनासाठी लोटला 50 हजार भाविकांचा जनसागर