Headlines

17 सेमी गाठ काढली, आयटी अभियंता 7 वर्षांनी चालू लागला:मणिपाल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली




मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील डॉक्टरांनी एका ५२ वर्षीय आयटी अभियंत्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. पाठीच्या कण्यात १७ सेंटीमीटर लांबीची दुर्मिळ गाठ असल्याने गेल्या सात वर्षांपासून ते व्हीलचेअरवर होते. अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकीय शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढण्यात आल्यानंतर रुग्ण पुन्हा उभा राहून आधाराच्या मदतीने चालू लागला आहे. महेश पाटील (नाव बदलले आहे) यांना सुरुवातीला डाव्या पायात सतत वेदना आणि बधीरपणा जाणवत होता. कालांतराने दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा वाढत गेला आणि त्यांची चालण्याची क्षमता पूर्णपणे गेली. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठा परिणाम झाला होता. पुढील तपासणीत एमआरआयमध्ये पाठीच्या कण्यात एक मोठी गाठ असल्याचे निदान झाले. स्पाइन सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. प्रविण सुरवशे यांनी याबाबत माहिती दिली. रुग्णाच्या पाठीच्या कण्यात सुमारे १७ सेंटीमीटर लांबीचा ‘इंट्राड्यूरल एक्स्ट्रामेड्युलरी श्वानोमा’ होता. ही गाठ कर्करोगजन्य नसली तरी तिच्या मोठ्या आकारामुळे पाठीच्या कण्यावर आणि मज्जातंतूंवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. उपचारास विलंब झाल्यास कायमस्वरूपी अपंगत्व तसेच मूत्राशय व आतड्यांवरील नियंत्रण जाण्याचा धोका होता, असे डॉ. सुरवशे यांनी सांगितले. अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पाठीचा कणा आणि मज्जातंतूंचे संरक्षण करत ही गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन महिन्यांत रुग्ण स्वतंत्रपणे उभा राहू लागला आहे. सध्या तो चालण्यासाठी वॉकरचा वापर करत असून, कमी अंतरावर आधाराशिवायही चालण्यास त्याने सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सतत पाठदुखी, बधीरपणा, पायांमध्ये अशक्तपणा किंवा चालताना त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने तपासणी करून आवश्यक असल्यास एमआरआय करणे महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *