![]()
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विकसित केलेले ‘इको बाप्पा’ ॲप यावर्षीच्या गणेशोत्सवात पूर्ण क्षमतेने रिलॉन्च होऊ शकले नाही. तांत्रिक अडचणींमुळे यावर्षीचा मुहूर्त टळल्याची माहिती समोर आली आहे. एमपीसीबीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी याला दुजोरा दिला. मात्र, हे ॲप भविष्यात नव्या आणि अत्याधुनिक फीचर्ससह पुन्हा सेवेत दाखल होईल, असे त्यांनी सांगितले. या ॲपचा उद्देश पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला डिजिटल बळ देणे हा होता. यावर केवळ शाडूमाती आणि चिकणमातीच्या पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या पारंपरिक मूर्तीकारांनाच नोंदणी करता येणार होती. गेल्या वर्षी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता आणि यंदा त्यात व्यापक सुधारणा करण्याचे नियोजन होते. नव्या नियोजनानुसार, ग्राहकांसाठी जीपीएस आधारित लोकेशन, मूर्तींचे थेट व्हिडिओ पाहण्याची सुविधा आणि पसंतीची मूर्ती शोधण्याचे आधुनिक पर्याय यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. मूर्तीकार स्वतः आपली माहिती, संपर्क क्रमांक, छायाचित्रे आणि १० ते २० सेकंदांचे व्हिडिओ ॲपवर अपलोड करू शकणार होते. ग्राहकांना त्यांच्या परिसराजवळ असणाऱ्या नोंदणीकृत मूर्तीकारांचा शोध ‘गुगल मॅप’द्वारे घेता यावा, अशी सोय होती. तसेच, आवडलेल्या मूर्तीला लाईक व शेअर करण्याची सुविधाही देण्याचा मानस होता. ॲपचा डेटा एमपीसीबीच्या वेबसाईट व सोशल मीडिया हँडल्सशी लिंक करून वेबसाईटवर ‘इको फ्रेंडली आयडॉल मेकर्स’ अशी नवीन विंडो सुरू करण्याचे ठरले होते. याशिवाय, महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम विसर्जन तलावांची माहितीही याद्वारे उपलब्ध होणार होती. सुरुवातीला मोजक्या घटकांपर्यंत मर्यादित असतानाही या व्यासपीठावर ७५० हून अधिक ग्राहक आणि सुमारे ३०० मूर्तीकार जोडले गेले आहेत. अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध होणारे हे ॲप शाश्वत उत्सवासाठी एक महत्त्वाचे डिजिटल माध्यम ठरणार होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे यावर्षी गणेशोत्सवापूर्वी त्याचे रिलांच होऊ शकले नाही.
Source link
‘इको बाप्पा’ ॲप रिलॉन्चला तांत्रिक अडचणी:गणेशोत्सवापूर्वी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मुहूर्त टळला