Headlines

60 CCTV कॅमेरे तपासले अन् आरोपी गजाआड:सातारा पोलिसांची स्मार्ट कारवाई, महिला-मुलींची छेड काढणाऱ्याला ठोकल्या बेड्या




सातारा शहरातील पोवई नाका परिसरासह विविध भागांमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांसमोर अश्लील चाळे करून त्यांची छेड काढणाऱ्या एका ४० वर्षीय विकृताला सातारा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून अत्यंत कौशल्याने त्याचा माग काढला. विनोद मोहन कामटे (वय ४०, सध्या रा. सैदापूर, सातारा. मूळ रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नेमका प्रकार काय? सातारा शहरातील पोवई नाका परिसरात एका खासगी क्लाससाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला या आरोपीने जवळ बोलावून तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि अर्धवट नंबर प्लेटवरून शोध गुन्ह्याचा तपास करताना डी.बी. पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यामध्ये आरोपीच्या हालचाली आणि त्याने वापरलेल्या मोटारसायकलची अर्धवट नंबर प्लेट पोलिसांच्या नजरेस पडली. याच धाग्यावरून पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील तब्बल ६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासात असे निष्पन्न झाले की, या विकृताने केवळ या मुलीसोबतच नव्हे, तर शहरातील अन्य काही महिला आणि मुलींसमोरही असेच अश्लील वर्तन केले होते. सैदापूरमध्ये आवळल्या मुसक्या सीसीटीव्हीच्या या ‘ट्रेल’चा (मार्गाचा) पाठलाग करत पोलीस सैदापूरपर्यंत पोहोचले. तेथे स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि विनोद कामटे याला शिताफीने ताब्यात घेतले. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात या विकृत आरोपीविरोधात गुन्हा (क्र. ६६४/२०२६) दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ७४ आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील कलम ८ व १२ नुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. ही यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि त्यांच्या डी.बी. पथकाने केली आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे साताऱ्यातील महिला आणि मुलींनी समाधान व्यक्त केले आहे. हेही वाचा.. स्पष्ट पुरावे असूनही FIR का नाही?: सरकार कोणाला वाचवतंय?’; MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीवरून मनसे आक्रमक, विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीच्या आरोपावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी या प्रकरणातील कथित पेपरफुटीचे पुरावे राज ठाकरे यांच्यासमोर मांडले असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *