![]()
नागपूर जिल्ह्यातील मासोद गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाजवळच्या या गावात सोमवारी रात्री एका बिबट्याने थेट मानवी वस्तीत प्रवेश करत एका घराच्या गच्चीवर चढून शेळीची शिकार केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण गावात मोठी दहशत पसरली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ग्रामस्थ रामदास नेहारे यांच्या घराच्या गच्चीवर शेळ्या बांधलेल्या होत्या. अचानक शेळ्यांचा मोठा आरडाओरडा ऐकू आल्याने नेहारे यांनी वर जाऊन पाहिले असता, त्यांना बिबट्या शेळीवर हल्ला करताना दिसला. घरमालकाने तत्काळ आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेजारील घराच्या दिशेने उडी मारली आणि लगतच्या बागेत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी टॉर्चच्या प्रकाशात बिबट्याचा माग काढत त्याला हुसकावून लावले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग आणि नागपूरहून आलेली बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालून फटाके फोडत बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. तसेच, बिबट्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापूर्वी शेतातील गोठे किंवा पशुधनावर होणारे हल्ले सामान्य मानले जात होते. मात्र, आता थेट गावाच्या मध्यवस्तीत आणि घराच्या गच्चीवर येऊन बिबट्याने शिकार केल्यामुळे शेतकरी, मजूर आणि पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Source link
नागपूरजवळ बिबट्याची गावात घुसून गच्चीवर शेळीची शिकार:मासोद गावात मध्यवस्तीत घडलेल्या घटनेने ग्रामस्थांमध्ये दहशत