![]()
पुणे महापालिकेत समाविष्ट गावांवर लावण्यात आलेल्या वाढीव कराविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र आंदोलन केले. हा वाढीव कर तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समाविष्ट गावातील नागरिक आधीच अनेक समस्यांनी त्रस्त असताना त्यांच्यावर वाढीव कराचा अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. सभेचे कामकाज सुरू असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. महापालिका प्रशासन समाविष्ट गावांतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असताना कराचा बोजा वाढवणे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांनी म्हटले. वाढीव कराचा निर्णय तातडीने मागे घेऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सोपान उर्फ काका चव्हाण यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेतली. समाविष्ट गावांवरील वाढीव कराच्या प्रश्नावर स्वतंत्रपणे चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी त्यांनी केली. हा प्रश्न व्यापक असून त्यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. या मागणीनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी समाविष्ट गावांवरील वाढीव कराच्या प्रश्नावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे आश्वासन दिले. सर्व संबंधितांशी चर्चा करून या विशेष सभेची तारीख निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरांच्या या आश्वासनानंतर विरोधकांनी आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे सभागृहातील तणाव तात्पुरता निवळला आहे. मात्र, विशेष सर्वसाधारण सभेत वाढीव कराच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. समाविष्ट गावांतील नागरिकांना या सभेकडून मोठ्या अपेक्षा असून, वाढीव कराचा बोजा कमी होणार की कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
समाविष्ट गावांच्या वाढीव कराविरोधात विरोधक आक्रमक:विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे आश्वासन