Headlines

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई:चाकणमध्ये पहाटे 4 वाजता 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, 83 किलो गांजासह दोघे गजाआड




पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम गांजा, एक स्कॉर्पिओ गाडी, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व तस्करीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. पोलिस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे 2) प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. पहाटे 4 वाजताच्या सुमारास चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकण येथील ‘रुबी बेकरी’जवळ (खंडोबा माळ, ता. खेड, जि. पुणे) गस्त घालत असताना पोलिस अंमलदार निखिल वर्षे आणि विजय दोंडकर यांना संशय आला. त्यांनी दोन तरुणांना थांबवून चौकशी केली असता, त्यांच्याकडे अंमली पदार्थांचा मोठा साठा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय 24, रा. खंडोबामाळ, चाकण) आणि कुशल उद्धव पाठक (वय 24, रा. शिवसाई नगर, सुतारदरा, कोथरूड, पुणे) या दोघांना घटनास्थळावरून अटक केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 41 लाख 98 हजार रुपये किमतीचा 83 किलो 960 ग्रॅम गांजा, 15 लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची एक स्कॉर्पिओ गाडी, 75 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन्स आणि 510 रुपयांची रोख रक्कम समाविष्ट आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(क), 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दगडे करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, सपोनि विक्रम गायकवाड, पोउपनि रोहित दिवटे, जिलानी मोमीन, निखिल वर्षे, विजय दोंडकर व इतर अंमलदारांच्या पथकाने पार पाडली. अंमली पदार्थांच्या संदर्भात कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथक (8600002320), पोलिस हेल्पलाईन (112) किंवा ‘मानस’ हेल्पलाइन (1933) वर संपर्क साधण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *