![]()
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सूक्ष्म आणि लघु उद्योगांचे मोठे योगदान आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी व्यक्त केले. लघु उद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या पाठबळाशिवाय मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले. लघु उद्योग भारती महाराष्ट्र प्रदेशातर्फे ‘महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका’ या विषयावर पुण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित घैसास यांनी धवसे यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला पुणे, सातारा, सांगली, ठाणे, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथून ७० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक आहेत. राज्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढत असून, या उद्योगांना सरकारचे पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्र निश्चितपणे अग्रेसर होईल, असे धवसे यांनी नमूद केले. संरक्षण, स्टील, टेक्स्टाइल आणि माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांनी पुरवठा साखळी समजून घेऊन काम करणे आवश्यक आहे. सध्याच्या उद्योगातील लाटेचा अभ्यास करून काम केल्यास उद्योजकांना चांगला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी राज्यामध्ये उद्योग मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे या भागापुरता मर्यादित होता, ज्यामुळे काही प्रमाणात प्रादेशिक असमतोल निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार आल्यानंतर हा असमतोल दूर होत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर या भागांचा चांगल्या प्रमाणात औद्योगिक विकास होत आहे. आतापर्यंत नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीचे रूप बदलत असून, तिथे स्टील उद्योगाचा विकास होत आहे. समृद्धी महामार्गामुळे या भागातील उद्योगांना चांगला फायदा होत आहे. उद्योगासाठी आवश्यक उत्तम प्रकारची इको सिस्टीम या माध्यमातून तयार होत आहे. राज्यात अनेक भागांमध्ये क्लस्टर उभी राहत आहेत, ज्यामुळे उद्योग वाढीस गती मिळेल आणि राज्याच्या अर्थचक्राला वेग येईल. पुण्याजवळच्या सुप्यामध्ये सरकार खास जपानी कंपन्यांसाठी क्लस्टर उभे करत असल्याचे धवसे यांनी यावेळी सांगितले.
Source link
सूक्ष्म, लघु उद्योगांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान:मुख्यमंत्री सल्लागार कौस्तुभ धवसे यांचे प्रतिपादन; एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेवर चर्चा