Headlines

"राजकारणात तुम्हाला पोरं होत नाहीत, म्हणून आमची पोरं पळवताय?":शिवसेनेच्या हिरक महोत्सवात उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात




“तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार, निवडणूक आयोग, भाजपचे हिंदुत्व आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवरून अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केले. त्यांच्या या झंझावाती भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: 1. काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या अफवांवर सडेतोड उत्तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सत्ताधाऱ्यांकडून पेरल्या जात आहेत. यावर सडेतोड उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना कधीही विलीन होत नसते. काँग्रेसने आपल्याला भूतकाळात त्रास दिला, आपले टोकाचे वैर होते. पण त्यांनी कधी ‘मातोश्री’वर डोळे वटारले नाहीत किंवा शिवसेना मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केला नाही. जे भाजप आज करत आहे.” भाजपला टोला लगावताना ते म्हणाले, “एक भाजप नेता मला म्हणाला की, आम्ही गावोगावी पक्ष वाढवला आणि आता दिल्लीच्या आदेशामुळे आम्हाला मिंधेंची दाढी खाजवावी लागत आहे. भाजपचे दोन तृतीयांश खासदार बाहेरचे आहेत. तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत, म्हणून तुमच्या विचारांच्या वांझोटेपणावर तुम्ही उपचार करण्याऐवजी आमची पोरं का पळवताय?” 2. ठाकरे कुटुंबावरील आरोपांवरून संताप “आज माझ्यावर, पत्नी रश्मीवर, आदित्य आणि तेजसवर अत्यंत घाणेरडे आरोप केले जात आहेत. घरबसल्या ट्रोलिंग करून शिव्या दिल्या जात आहेत. ज्यांनी गद्दारी केली, ते म्हणतात की मी भेटत नव्हतो. गधड्या, जर मी भेटत नव्हतो तर तू निवडून कसा आलास? तुमच्यासाठी मी लोकसभेत 6-10 सभा घेतल्या. वडाचे झाड मोठे असते, त्याला पारंब्या असतात. लोक वडाच्या खोडाला नमस्कार करतात, पण पारंब्यांना वाटतं की लोक आपल्यालाच नमस्कार करत आहेत. खरी किंमत उद्धव ‘बाळासाहेब’ ठाकरे या नावाला आहे.” 3. ‘ऑपरेशन लोटस’ नाही, आता देशात ‘ऑपरेशन कमळ’ करावे लागेल देशातील राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, “सध्या देशात लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. मशालीचे बटन दाबा, तुतारीचे दाबा किंवा हाताचे दाबा, भाजप म्हणतंय तुम्ही कोणतंही बटन दाबा तो माणूस आमच्याकडेच येणार आहे. मग निवडणुका घेता कशाला? एक व्यंगचित्र आले आहे, ज्यात चोरी पकडल्यावर चोर म्हणतो, याला चोरी नाही, ‘ऑपरेशन’ म्हणा! जर हे असे राजकीय ऑपरेशन करत असतील, तर आता देशाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळून ‘ऑपरेशन कमळ’ (भाजपवर शस्त्रक्रिया) करावे लागेल.” 4. भाजपचे ‘भोंदुत्व’ आणि आमचे ‘राष्ट्रीयत्व’ हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करताना ते म्हणाले, “आज जे आपल्याला विरोध करत आहेत, तेच माझ्या आजोबांना (प्रबोधनकारांना) विरोध करणारे गोमूत्रधारी आहेत. यांचे हिंदुत्व म्हणजे ‘भोंदुत्व’ आहे. आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नसून ते ‘राष्ट्रीयत्व’ आहे. जो माणूस भगव्या झेंड्यामध्ये भेद करतो, तो हिंदू असूच शकत नाही.” 5. निवडणूक जिंकण्यासाठी सुरक्षा दलांचा गैरवापर “सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात प्रांत आणण्यासाठी रझाकारांवर पोलिस कारवाई केली होती. पण यांनी बंगालमध्ये एका महिलेला (ममता बॅनर्जी) हरवण्यासाठी दोन-अडीच लाख पोलिस घुसवले. पक्ष फोडायला तुम्ही देशाचे सुरक्षा दल वापरता? हेच बळ मणिपूर किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये का घुसवले नाही?” असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला. 6. शेतकऱ्यांना अटी आणि खासदार खरेदीला सवलती? शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरताना ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना तुम्ही हजारो अटी लादता. पण आमदार आणि खासदार विकत घ्यायला तुमच्याकडे अटी नाहीत? ‘लाडकी बहीण’ योजनेत 80 लाख महिलांना अपात्र ठरवले. देशात तरुणाईला ‘झुरळ’ मानले जात असेल, तर देशाचे भविष्य काय? देश अराजकतेकडे चालला आहे.” 7. कायदेशीर मुद्दा: 6 लोकांच्या मताने विलीनीकरण होत नाही सध्या सुरू असलेल्या खासदार फुटीच्या चर्चांवर त्यांनी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. ते म्हणाले, “दहाव्या शेड्युलनुसार स्वतःहून पक्ष सोडून जाणारा अपात्र ठरतो. केवळ ६ लोकांच्या मतानुसार पक्षाचे विलीनीकरण होत नसते, त्यासाठी पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असतो.” “मी पद सोडायला तयार आहे…” भाषणाच्या शेवटी शिवसैनिकांना भावनिक साद घालत उद्धव ठाकरे म्हणाले, “संकटामागून संकटे आली आणि पुढेही येतील. पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे, तोवर मी ‘अंह’ सुद्धा करणार नाही. पण जर कोणा लाचार माणसाने केलेले आरोप तुम्हाला खरे वाटत असतील, तर मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही, मी आताच पायउतार व्हायला तयार आहे. अनेक वादळे आली, पण मी डगमगणारा नाही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *