Headlines

सिल्लोड तालुक्यामध्ये टंचाईचे चटके; 21 गावांना 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा:तापमानाचा तडाखा कायम, जलस्त्रोतांची पातळी खालावली




तालुक्यात उन्हाचा कडाका वाढण्यासोबतच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून, प्रशासकीय पातळीवर तात्पुरती मलमपट्टी सुरू झाली आहे. चालू आठवड्यापर्यंत तालुक्यातील तब्बल २१ गावांची तहान भागवण्यासाठी २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर इतर १३ गावांमध्ये पाण्यासाठी १४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दुसरीकडे, तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ही कामे नक्की किती दर्जेदार झाली, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तालुक्यात दरवर्षीच काही ठराविक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी देखील परिस्थिती बिकट झाली असून, खालील २१ गावांमध्ये २८ टँकरद्वारे दररोज ५३ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. वांगी, चिंचवन, वरुड (खुर्द), पिंपरी, बोदवड, सराटी, बोजगाव, मोढा (खुर्द) वाडी-वस्ती, वडोदचाथा, तलवाडा, आसडी, वडोदचाथा वस्ती, वरखेडी, भायगाव, पिरोळा, डोईफोडा, गव्हाली, वडाळा, विरगाव, रेलगाव (परदेशी वाडी), पिंपळदरी, धावडा आणि जुना पानेवाडी या गावांना टँकर सुरू आहेत. तर टँकरव्यतिरिक्त ज्या भागांत भूजल पातळी काही प्रमाणात बरी आहे, अशा १३ गावांमधील १४ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. यामध्ये बोरगाव बाजार, मुकपाठ, दिडगाव, केऱ्हाळा, आसडी, म्हसला (बुद्रुक), धारला, गेवराई सेमी, अंधारी, बोरगाव कासारी (२ विहिरी), बनकिन्होळा या गावांचा समावेश आहे. दरवर्षी प्रशासन टँकरवर लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र, पावसाळा सुरू झाला की या योजना गुंडाळल्या जातात. गावांच्या प्रस्तावांची संख्या वाढतीच पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे गावोगावून टँकरची मागणी वाढली आहे. सध्या बाळापूर, गोळेगाव (खुर्द), पानस, घटाब्री, शिवना येथील ईदगाह वाडी आणि भोपळे वाडी या ठिकाणांहून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठीचे नवीन प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासन पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा रास्त प्रश्न आता सिल्लोडमधील नागरिक विचारत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *