![]()
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापुर तर्फे शेवाळा या गावांमध्ये शेतखरडणी अनुदान वाटपात गैरव्यवहार करून शासनाची ६.१५ लाख फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी येथील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी तारीख 8 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील पिंपरी कृष्णापुर तर्फे शेवाळा व अन्य एका गावामध्ये सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडणीचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र सदर अनुदान मंजूर करताना सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार याने ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नाहीत त्यांच्या नावे अनुदान मंजूर केले. एवढेच नव्हे तर कमी शेत असलेल्या शेतकऱ्यांना ज्यादा अनुदान मंजूर केले. काही ठिकाणी तर शेतकरी एका गावातील आणि शेती दुसऱ्या गावात दाखवून अनुदान मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात पिंपरी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश कळमनुरी तहसील कार्यालयाला दिले होते. त्यावरून तहसील कार्यालयाने स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली. दरम्यान या प्रकरणांमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी संगमवार याने सदर प्रकार केल्याचे चौकशी स्पष्ट झाले. त्यानंतर आज तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बुधवारी 8 रोजी रात्री सहाय्यक कृषी अधिकारी संगमवार याच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, सपोनी डी. बी. बसवंते, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, जमादार गजानन राठोड, प्रशांत शिंदे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या अनुदान वाटप प्रकरणांमध्ये आणखी काही कर्मचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये त्यावेळी अनुदान मंजूर झालेल्या याद्या, शेतकऱ्यांच्या नावे असलेली सातबारा, ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या बँक खात्याचा तपशिल पोलिसांनी मागवला आहे. याशिवाय संगमवार याच्या अधिक चौकशीमध्ये सर्व बाबी स्पष्ट होणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले
Source link
शिंदेंना निमंत्रण नाही, मंत्रिमंडळ बैठकीत उमटले पडसाद:सहाय्यक कृषी अधिकाऱ्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल