Headlines

शिरवळमध्ये दोन गुन्ह्यांचा छडा:अल्पवयीनांच्या मदतीने सराईत आरोपीपर्यंत पोलिसांची मजल




शिरवळ परिसरात घडलेल्या घरफोडी आणि जबरी चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांचा छडा लावण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकींसह तब्बल ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरवळच्या दत्तनगर परिसरात १२ ऑगस्ट रोजी बंद घराला लक्ष्य करण्यात आले होते. घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे गंठण, नेकलेस, चैन, कानातील फुले आणि २० हजार रुपये रोख असा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याच परिसरातील आणखी एका घरातही चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यातून दोन अल्पवयीन संशयित पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीतून साहिल विजय कोळी (वय २१, रा. पंढरपूर फाटा, शिरवळ) याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार करीत आहेत. दरम्यान, पुणे-सातारा महामार्गावरील फुलगळा बोगद्याजवळील सर्व्हिस रोडवर पादचाऱ्याला अडवून मोबाईल लुटल्याची घटना घडली होती. हॉटेलमध्ये जेवण करून पायी जात असलेल्या २३ वर्षीय युवकाला दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी अडवले. मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करून त्याच्या खिशातील सुमारे १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले होते. या घटनेच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतल्यानंतर अनिरुद्ध सुमित गायकवाड (वय २५, रा. भोळी, ता. खंडाळा) आणि आर्यन जीवन जाधव (वय २४, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांना अटक करण्यात आली. दोन्ही प्रकरणांतील आरोपींना खंडाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस हवालदार दत्तात्रय धायगुडे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल सूरज चव्हाण, अक्षय नेवसे, अक्षय बगाड आणि काजल शिगटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शिरवळ परिसरातील चोरीच्या घटनांचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *