![]()
नागपूरमध्ये रविवारी ढोल-ताशा वादनाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल आणि ताशा वाजवले. या भव्य सांस्कृतिक महासंगमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृतपणे नोंद झाली आहे. हा विक्रम ‘जेनझी संवाद’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विदर्भातील विविध शहरांमधून २०० हून अधिक ढोल-ताशा पथकांना एकाच मंचावर आमंत्रित करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात तब्बल ५८५ ध्वजधारकांनी आपापल्या पथकाचे नेतृत्व केले. एकाच वेळी, एकाच तालावर ४ हजार तरुणांनी ढोल आणि ताशांवर वादन केले. ढोलांच्या थापेने आणि ताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर दणदणाटाने आणि उत्साहाने दुमदुमून गेला. नागपूरचा आसमंत या वादनाने थरारून उठला होता. या विक्रमी आयोजनाची दखल घेण्यासाठी ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी करून विक्रम यशस्वी झाल्यानंतर आयोजकांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुण पिढीसोबत संवाद साधत त्यांच्या सांस्कृतिक उत्साहाचे कौतुक केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची ढोल-ताशा परंपरा ही केवळ एक वादन कला नसून, ती आपली सांस्कृतिक ओळख आणि सामूहिक ऊर्जेचे प्रतीक आहे. एकाच वेळी ४ हजार तरुणांचे हे ढोल-ताशा वादन पाहण्यासाठी नागपूरसह आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Source link
नागपुरात 4 हजार तरुणांनी ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम केला:एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; 585 ध्वजधारकांचा सहभाग