![]()
संत गुलाबराव महाराजांच्या लोणी (टाकळी) येथील संस्थानच्या विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. लोणी येथील संत गुलाबराव महाराज संस्थानला शासनाने ‘ब’ दर्जा दिला असला तरी, अपेक्षित विकास न झाल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. संत गुलाबराव महाराजांचे विचार आणि कार्य आजही लाखो भाविकांना प्रेरणा देत असताना, त्यांच्या जन्मभूमीतील मंदिर परिसर मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, परिसर सुशोभीकरण, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याची मागणी होत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील महाराजांच्या राहत्या घराचा जीर्णोद्धार आणि इतर विकास कामांसाठी संत गुलाबराव महाराज विकास आराखडा मंजूर करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मागण्यांसाठी संस्थानचे अध्यक्ष विनय देशमुख, उपाध्यक्ष दीपक बोबडे, सचिव अशोक सवाई यांच्यासह सदस्य किशोर राऊत, गोरखनाथ कडू, सचिन गायगोले, जितेंद्र शिंदे आणि प्रवीण सवाई हे सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. संत गुलाबराव महाराजांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचले असताना, त्यांच्या जन्मभूमीचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भाविकांनी मंदिराचा जीर्णोद्धार, गुलाब वाटिका प्रकल्प आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी विशेष निधीची मागणी केली आहे. दरम्यान, राज्य शासनाने संत गुलाबराव महाराजांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे श्रीक्षेत्र लोणी (टाकळी) हे गाव चर्चेत आले असून, महाराजांच्या कार्य आणि विचारधारेबाबत नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी ६ जुलै रोजी श्रीक्षेत्र लोणी (टाकळी) येथे भेट देण्याची शक्यता आहे. नुकत्याच मंत्रालयात झालेल्या भेटीत संत गुलाबराव महाराजांचे साहित्य, तत्त्वज्ञान आणि राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संत गुलाबराव महाराज साहित्य प्रचार मोहिमेचे प्रमुख माधुर्य ठाकरे यांनी दिली.
Source link
संत गुलाबराव महाराज संस्थान विकासासाठी मुख्यमंत्र्यांची भेट:लोणी येथील आराखड्याची मागणी, 6 जुलैला फडणवीस येणार